भारत जोडो यात्रेवरील हल्ला; ठाण्यात काँग्रेसकडून निषेध

ठाणे: काॅग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज स्टेशन रोड येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत शहर काॅग्रेस अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण आणि प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम येथे भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करित जोरदार घोषणा दिल्या.

याप्रसंगी शहर काॅग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, काँग्रेस नेते रविंद्र आंग्रे महिला अध्यक्षा स्मिता वैती, रेखा मिरजकर, सेवादल अध्यक्ष शेखर पाटील, प्रवक्ते राहुल पिंगळे, प्रदेश सदस्य जे.बी.यादव, प्रदिप राव,सुखदेव घोलप,राजेश जाधव, शकीला शेख, निशिकांत कोळी, रमेश इंदिसे, शैलेश शिंदे, रविंद्र कोळी, मंजूर खत्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांनी सागितले की, भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व जनतेला आवाहन करतात की राम मंदिराचा उत्सव सर्वत्र साजरा करा. जवळच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करा आणि त्याच प्रसंगी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात येते, असा दुजाभाव कशासाठी करीत आहेत?असा सवाल करित भारतीय जनता पक्षाकडून जिथे जिथे काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करेल तिथे काँग्रेसचा एकूण एक कार्यकर्ता नव्याने उभारी घेऊन त्याचा निषेध करेल असे सागितले.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी सागितले की, राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जनतेकडून मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून भारतीय जनता पार्टीचे नेते पूर्णपणे बिथरले असून सविधानात्मक व लोकशाही मार्गाने निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झालेला हल्ला म्हणजेच लोकशाही संपवण्याचा डाव असल्याचा आरोप करित त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी भारत जोडो न्याय यात्रा ही निश्चित केलेला टप्पा पार पडेल असे सागितले.