ठाणे : रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर‘ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ५० टक्के चालकांची नजर कमजोर असल्याचे उघड झाले असून, ८० चालकांना चष्मा आणि सहा चालकांना मोतीबिंदू असल्याचेही आढळले आहे.
वर्षानुवर्षे वाहन चालवताना चालकाची नजर कमजोर होत जाते. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक असत. त्यामुळे नेत्रांची काळजी घेणे क्रमप्राप्त आहेच. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करणे अत्यावश्यक असते. अनेक चालक डोळ्यांची तपासणी करण्यात हयगय करतात. त्यामुळे वाहन चालवताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे, असे ठाणे आरटीओ अधिकारी सांगतात.
त्यामुळे रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त चालकांच्या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
ठाणे प्रादेशिक परिवहनचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भक्ती वेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’च्या सहकार्याने चालकांच्या डोळ्यांची तपासणी केली. यावेळी १८० रिक्षा, ट्रक, टेम्पो चालकांची तपासणी केली आहे,असे माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. विजय शेळके यांनी सांगितले.
‘डोळ्यांच्या बाबतीत चालक वर्ग काहीसा बेफिकीर आहे, असे तपासणी शिबिरात दिसून आले. डोळ्याकडे दुर्लक्ष केल्यावर अनेकदा याचा परिणाम नजरेवर होतो, हेदेखील चालकांना सांगण्यात आले.
माजिवडा-मानपाडा वाहनतळावर एकूण १८० वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ८० चालकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. या अभियानासाठी ठाणे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे, वाहन चालक-मालक संघटनेच्या मानपाडाचे रामदास वाढवणे, वाहन चालक संघटना माजिवाडा देवेंद्र राजपूत, मोटर वाहन निरीक्षक नितीन जाधव, प्रवीण खेडकर व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रवीण कांबळे, प्रमोद आरगडे हे उपस्थित होते.