भाईंदर: विभागप्रमुखांच्या मर्जीनुसार सलग एकाच विभागात एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या सुभेदारांच्या बदलीचे आदेश आज काढण्यात आले.
या सुभेदारीबाबत अनेकांनी शासन निर्णयानुसार बदली करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली. मात्र शासन नियमाला धुडकावून सुभेदारांची सुभेदारी कायम होती. नगररचना विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त मारुती गायकवाड यांनी चार अधिकाऱ्यांचे बदली आदेश पारित केले.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या भोंगळ कारभाराला आयुक्त संजय काटकर यांनी वेसण घालण्यास सुरुवात केली असून मालमत्ता करासह इतर प्रशासकीय कामकाजावर नजर केद्रींत केली आहे. शहरातील लाखोंच्या मालमत्ता थकबाकीदार मालमत्ता सीलबंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मालमत्ता कर कर्मचारी धावपळ करीत आहेत. पालिकेच्या आर्थिक उत्पन्न देणाऱ्या नगररचना विभागाकडे लक्ष देत नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता विकास परब व शाखा अभियंता प्रांजल कदम या दोन अधिकाऱ्यांना अनुक्रमे उद्यान विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात हलविले आहे.
विकास परब मागील अनेक वर्षापासून नगररचना विभागात कार्यरत असून प्रांजल कदम यांचा नगररचना विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असे कामकाज सुरू आहे. अल्प कालावधीसाठी पाणीपुरवठा विभागातही नियुक्ती करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता सतिश तांडेल यांची नगररचना विभागात वर्णी लागली असून उद्यान विभागातील कनिष्ठ अभियंता यशवंत देशमुख यांना पुन्हा नगररचना विभागात नियुक्ती मिळाली आहे.