अशोक चव्हाण यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला
नांदेड : महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने १२ जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केल्याने मविआची चिंता वाढली आहे. असे असले तरी जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे आणि कोण जागा निवडून आणू शकतो हेच खरं जागावाटपाचं समीकरण असणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीकडे लोकसभेच्या १२ जागांची मागणी केली आहे. याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार जागा मागत आहेत. संजय राऊत यांची २३ जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशी इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर यांची १२ जागांची इच्छा आहे. शरद पवार गटाची काही इच्छा असेल. अशी गोळाबेरीज केली तर आकडा ४८ च्या वर जाईल. परंतु जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे, कोण जागा निवडून आणू शकतो, हेच जागा वाटपाचं समीकरण असणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत अद्याप लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. जोपर्यंत काँगेसचे केंद्रीय श्रेष्ठी निर्णय देत नाहीत, तोपर्यंत आम्हाला थांबावं लागणार असल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
दरम्यान लोकसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेसची दिल्ली येथे एक बैठक देखील पार पडली. दिल्लीच्या केंद्रीय समितीने महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती देखील जाणून घेतली. राज्यातील कोणत्या जागा लढण्यासाठी सोयीच्या असतील याबाबत चर्चा झाली. राजकीय समीकरणाची माहिती आम्ही केंद्रीय समितीला दिल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. बाकीच्या पक्षाशी बोलणी अजून सुरू आहेत. त्यांची मते जाणून घेऊन निर्णय होईल, असे चव्हाण म्हणाले.