८३ बॅगांमध्ये होते लॅपटॉप, सोन्याचे दागिने, महत्त्वाचा दस्तावेज
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे कर्मचा-यांची सतर्कता आणि प्रामाणिकपणा यामुळे जून ते ऑक्टोबर या काळात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्रे असलेल्या रेल्वे प्रवासात हरवलेल्या बॅगा ८३ प्रवाशांना परत मिळाल्या आहेत.
रेल्वे प्रवासात सोबत सामान घेऊन जाणे म्हणजे त्रासदायक असते. अशातच गर्दीच्या वेळी सामान घेऊन चढताना किंवा उतरताना आपले सामान सांभाळणे जोखमीचे ठरते. लहान-मोठे सामान असो, ते लांब पल्ल्याच्या गाडीतून जाताना किंवा लोकलमध्येही वस्तू राहिली की ती मिळेलच याची खात्री देता येत नाही. परंतु ठाणे स्थानकातील रेल्वे कर्मचा-यांची सतर्कता आणि प्रामाणिकपणा प्रवाशांना अनुभवण्यास मिळतो आहे. तब्बल साडेसात लाख प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठाणे स्थानकात गेल्या साडेचार महिन्यात मेल, एक्स्प्रेस, लोकलमध्ये किंवा स्थानक परिसरात आढळलेले किंमती सामान ८३ प्रवाशांना परत केले आहे.
कल्याण ते नेरूळ असा प्रवास करून एक महिला जात होती. ती ठाण्याहून नेरूळकडे जाणा-या लोकलमध्ये सोन्याचे दागिने असणारी पिशवी विसरली. ही घटना ठाणे रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक केशव तावडे यांना रेल्वे संपर्क कार्यालयाकडून समजली. महिला ज्या लोकल डब्यामध्ये बसली होती, तेथे कर्मचा-याला पाठवून मुद्देमाल ताब्यात घेतला आणि या महिलेला परत दिला. सोन्याच्या दागिन्यांची पिशवी मिळाल्यामुळे त्यांना खुप आनंद झाला होता, असे रेल्वे कर्मचा-याने सांगितले.
ठाणे रेल्वे व्यवस्थापक यांच्या कक्षात रेल्वे प्रवासात वस्तू हरवल्याची तक्रार येते. प्रवाशांच्या वस्तू शोधण्याचा रेल्वे अधिकारी आणि कर्मचा-यांकडून केला जातो. अनेकांचे सामान पुन्हा मिळतेही. यामध्ये काही प्रवासी वस्तू मिळाल्याचा अभाप्राय लिहून मध्य रेल्वेचे आभार व्यक्त करतात.
मालकाचा शोध घेऊन वस्तू मिळतात तत्परतेने आणि काही वेळा प्रवाशांच्या सतर्कतेमुळे रेल्वेकडे जमा झाल्यावर त्या-त्या वस्तूंच्या ख-या मालकाचा शोध घेऊन आवश्यक प्रक्रियेनंतर त्यांना ती सुपुर्द करण्याचे कौतुकास्पद काम मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकातील व्यवस्थापक आणि रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी, अन्य कर्मचारी करतात, असे ‘म.रे’चे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील यांनी सांगितले.