खा. राजन विचारे यांची मागणी
ठाणे: नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील मागील चार महिन्यांपासून तयार झालेले दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेरपर्यंत सुरू करा, अन्यथा रेल्वे रोको करून दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आम्ही करू, असा थेट इशारा खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी आणि मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांना पत्राद्वारे देण्यात आला आहे.
स्थानिक खासदार या नात्याने रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडे वारंवार विनंती करून सुद्धा दिघा रेल्वे स्थानक सुरू करण्यासाठी वेळ नसेल तर रेल्वे प्रवासी आणि दिघा वासियांना सोबत घेऊन दिघा रेल्वे स्थानक सुरु करू असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.
ऐरोली-कळवा एलिव्हेटेड या महत्वाकांक्षी प्रकल्पातील झोपड्यांचे पुनर्वसन होत नसल्याने हा प्रकल्प रेंगाळला होता. हा प्रकल्प रद्द होऊ नये म्हणून एमआरव्हीसी विभागाकडे पाठपुरावा करून प्रकल्प दोन टप्प्यात करून पहिल्या टप्प्यात दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करून घेतले आहे. या दिघा परिसरात नव्याने सुरू होणाऱ्या आयटी कंपन्या व त्यामध्ये बाहेरून येणारा नोकरदार वर्ग यांना ऐरोली रेल्वे स्थानकाचा किंवा ठाणे रेल्वे स्थानकाचा आधार घ्यावा लागतो त्यामध्ये प्रवाशांचा वाया जाणारा वेळ व पैशाची बचत टाळण्यासाठी त्याचबरोबर दिघावासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी या महिना अखेरपर्यंत दिघा रेल्वे स्थानक सुरु करा, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.