मुंबई: मागील आठवड्यात बाजारात काहीशी अस्थिरता दिसून आली होती. त्यानंतर आज सोमवारी शेअर बाजार वधारला. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 267 अंकांच्या तेजीसह 65,216 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 83 अंकांच्या तेजीसह 19,393 अंकावर बंद झाला.
कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?
आज दिवसभरातील व्यवहारात आयटी, एफएमसीजी आणि बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्याशिवाय, एनर्जी, मेटल्स, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर सेक्टरमध्ये ही गुंतवणूकदारांकडून खरेदीचा उत्साह दिसला. ऑईल अॅण्ड गॅस, मीडिया स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्सदेखील वधारले. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, निफ्टीतील 50 पैकी 39 कंपन्यांचे शेअर दर वधारले.
आज दिवसभरातील व्यवहारात पॉवरग्रीडच्या शेअर दरात 2.76 टक्के, बजाज फायनान्स 2.702 टक्के, इंडसइंड बँक 2.06 टक्के, भारती एअरटेल 1.92 टक्के, एनटीपीसी 1.51 टक्के, आयटीसी 1.31 टक्के, बजाज फिनसर्व 1.12 टक्के, इन्फोसिस 1.10 टक्के, नेस्ले 1.04 टक्के, टाटा स्टील, 0.99 टक्के, टीसीएस 0.95 आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, रिलायन्सच्या शेअर दरात 1.50 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 0.87 टक्के, एसबीआय 0.28 टक्के, मारुती सुझुकी 0.24 टक्क्यांची घसरण दिसून आली.
आज दिवसभरातील व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 306.89 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील सत्रात 303.39 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.50 लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) सूचीबद्ध असलेल्या बहुतांशी कंपन्यांचे शेअर दर तेजीसह बंद झाले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,907 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2,097 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. त्याच वेळी 1,623 शेअर्समध्ये घसरण झाली. तर 187 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 208 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 46 कंपन्यांच्या शेअर्स दराने 52 आठवड्यांच्या नीचांक गाठला. 19 कंपन्यांच्या शेअर दराने अप्पर सर्किट लागले. तर, तीन कंपन्यांच्या शेअर दरांना लोअर सर्किट लागले.