खासगी ठेकेदारांनी उडवला स्वच्छतेचा बोजवारा
ठाणे: कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे 18 जणांचा मृत्यू होऊनही ठामपा झोपेतून जागी झाली नसल्याचे दिसत आहे. मुंब्रा-कौसात कचऱ्याच्या पेट्या तुडुंब भरल्या असून येथील आरोग्य केंद्राचीही स्वच्छतेअभावी दुरवस्था झाली आहे. येत्या २४ तासांत स्वच्छतेची समस्या न सोडवल्यास हा कचरा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर कचरा आणून टाकण्यात येईल असा इशारा ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते अश्रफ (शानू) पठाण आणि सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया पठाण यांनी दिला आहे.
मुंब्रा शहरात सध्या कचऱ्याची मोठी समस्या आहे. शहरात सर्वत्र कचरा पडलेला आहे, रोज वाहने मिळत नसल्याने इमारतींमधून कचरा उचलला जात नाही. मर्जिया पठाण यांनी अमृतनगर येथील हजरत सय्यद ख्वाजा फकरुद्दिन शाह बाबा आरोग्य केंद्रास आणि परिसरातील संकुलांना भेट दिली. बाबा फखरुद्दीन यांना भेट दिली. यावेळी पत्रकारही उपस्थित होते. ठामपाचे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. दवाखान्याची अवस्थाही अत्यंत दयनीय आहे, पंखे, दिवे बंद आहेत, रुग्णांना बसण्यासाठी खुर्चीही नाही, कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे, असे मर्जिया पठाण यांनी सांगितले. परिसरात कचऱ्याचे साचलेले ढीग पाहता महापालिका नागरिकांच्या आणि रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप पठाण यांनी यावेळी केला.
पत्रकारांशी संवाद साधताना मरझिया पठाण यांनी ठामपावर आरोप केला की, जेव्हापासून ठामपाने ठेकेदारांवर काम सोपवले आहे, तेव्हापासून मुंब्रा शहरात स्वच्छतेचा अभाव आहे. पावसाळ्यातही येथे योग्य साफसफाई करता येत नाही. याबाबत जाब विचारला असता त्यांच्याकडून अनेक सबबी सांगितल्या जातात. मार्जिया पठाण म्हणाल्या की, या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता आहे. परिसरातील रहिवासी दरवाजे-खिडक्याही उघडण्यासही धजावत नाहीत. या सगळ्याला जबाबदार कोण? मर्जीया पठाण पुढे म्हणाल्या की, ठेकेदार म्हणतात, आम्हाला बिले मिळत नाहीत, पैशांअभावी काम करता येत नाही. तर ठेकेदारांना बिले नियमितपणे अदा करण्यात येतात, असे पालिकेचे म्हणणे आहे. प्रशासन आणि ठेकेदार हे एकमेकांवर चेंडू टोलवत असल्याने नागरिकांची नाहक कोंडी झाली आहे. येत्या 24 तासात कचरा साफ न झाल्यास आम्ही आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी विरोधी पक्षनेते अश्रफ पठाण आणि नागरिकांच्या समवेत महापालिकेच्या प्रवेशद्वारावर कचरा टाकू, असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला आहे. साफसफाई करणाऱ्या दोन्ही ठेकेदारांचा करार रद्द करावा तसेच मुंब्रा-कौसा येथील स्वच्छता, दवाखान्याची निगा आणि आरोग्यविषयक कामे तातडीने करण्यात यावी, अशी मागणी मर्जिया पठाण यांनी केली आहे.