आवक घटली; कांदा रडवणार

एपीएमसी घाऊक बाजारात दरात वाढ

नवी मुंबई: मागील काही दिवसांपासून टॉमेटोसह इतर भाज्यांनी महागाईचा कळस गाठला आहे. त्यामुळे गृहिणींचे किचन बजेट आधीच कोलमडले असताना आता आवक घटल्याने आगामी काळात कांदा देखील नागरीकांना रडवण्याच्या तयारीत आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचा दर्जा घसरला आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. साठवणूकीच्या कांद्याचा दर्जाही घसरला आहे. त्यामुळे बाजारात सध्या हलक्या प्रतिचा कांदा अधिक प्रमाणात दाखल होत आहे. परिणामी उच्चतम प्रतिच्या कांद्याला उठाव असल्याने दर वाढ होत आहे. घाऊक बाजारात कांद्याच्या दरात प्रतिकिलो २ ते ३ रुपये वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात आधी प्रतिकिलो १५-१८ रुपयांनी उपलब्ध असलेले कांदे आता १८-२२ रुपयांनी विक्री होत आहेत. किरकोळ बाजारात हाच कांदा ३० ते ३५ रुपयांना विक्री होत आहे.

एपीएमसीत कांद्याची आवक कमी असून ५० ते ६०टक्के हलक्या प्रतिचा कांदा दाखल होत आहे. पावसाने दडी मारल्याने नवीन कांदा लागवड केलेले उत्पादन देखील हाती लागणार नाही. त्यामुळे बाजारातील आवक घटणार आहे.

मंगळवारी सरासरीपेक्षा कमी आवक झाली असून बाजारात ७५ गाड्या दाखल झाल्या होत्या. सध्या पावसाने दडी मारली असून पावसाळी कांद्याच्या उत्पादनाला फटका बसत आहे, त्यामुळे पुढील काळातही नवीन कांद्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असून कांद्याचे दर आणखीन वधारण्याची शक्यता आहे अशी, माहिती येथील कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.

कोथिंबीर निम्या दराने

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आवक वाढली असून बहुतांश कोथिंबीर खराब होत आहे. त्यामुळे घाऊक भाजीपाला बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरला कमी उठाव असल्याने दर निम्यावर आले आहेत.

मागील आठवड्यात १० ते १४ रुपयांना उपलब्ध असलेली कोथिंबीर जुडी मंगळवारी कमीतकमी दोन ते तीन रुपये ते पाच ते सहा रुपयांनी विक्री झाली.

एपीएमसी बाजारात पुणे आणि नाशिकमधून कोथिंबीर दाखल होते. बाजारात मंगळवारी बाजारात दोन लाख ४९,५०० क्विंटल आवक झाली असून तेच मागील आठवड्यात दीड लाख क्विंटल आवक झाली होती. सध्या बाजारात आवक वाढली असून खराब कोथिंबीर आवक अधिक आहे. त्यामुळे बाजारात कोथिंबीरचे दर उतरले आहेत. तर ४०टक्के खराब कोथिंबीर येत असून व्यापाऱ्यांना फेकून द्यावी लागत आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात १० ते १४ रुपये प्रतिजुडी उपलब्ध असलेली कोथिंबीर आता पाच ते सहा रुपये तर किरकोळ बाजारात १५ रुपयांनी विक्री होत आहे.