भाईंदर: रविवारी दुपारी दोनच्या सुमारास भाईंदर पश्चिमेकडील सार्वजनिक शौचालयाचे प्लास्टर कोसळून दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत.
शौचालय सफाई करणाऱ्या निवासस्थानी सदर घटना घडली असून सदर शौचालय महापालिकेने बांधले असल्याचे सफाई कर्मचारी सांगत आहे. भाईंदर पश्चिमेकडील जय अंबेनगर परिसरात चाळसदृश निवासी वसाहत असून तेथील रहिवाशांना सार्वजनिक शौचालय सुविधा मीरा-भाईंदर महापालिकेमार्फत पुरविण्यात येत आहे. सदर सार्वजनिक शौचालय दैनंदिन साफसफाई व देखभालीसाठी वार्षिक सुमारे चौदा करोडचा ठेका खाजगी संस्थेला दिला आहे.
या शौचालयाची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शौचालयाच्या वर निवासाची सुविधा देण्यात आली आहे. रविवारी दुपारी २ च्या सुमारास निवासी छताचे प्लास्टर कोसळून एक महिला व युवक किरकोळ जखमी झाले आहेत.