जनरल एज्युकेशनच्या ब्लॉसम शाळेच्या वार्तापत्राचे झाले प्रकाशन
ठाणे: लोकांचे वाचन कमी होत चालले आहे, त्यामुळे त्यांचा शब्दसंग्रह आटला आहे आणि त्यामुळे हिंसा वाढताना दिसत आहे. शब्दच नसल्यामुळे लोक हातात दगडे घेताना दिसत आहेत, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी व्यक्त केली.
जनरल एज्युकेशनच्या डोंबिवली येथील ब्लॉसम सीबीएससी इंटरनॅशनल शाळेच्या ‘ब्लॉसम ट्रीब्यून’ वार्तापत्राच्या प्रकाशन समारंभात श्री. लाटकर बोलत होते. अशा उपक्रमातून नवीन वाचक तयार होण्यास मदत होते.
शाळेच्या मुलांना लिखाण आणि वाचन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी जनरल एज्युकेशनने हा पुढाकार घेतला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.उल्हास कोल्हटकर यांनी सांगितले. मुलांमध्ये प्रचंड क्षमता असते त्याला योग्य चालना मिळाली तर त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. ब्लॉसम ट्रीब्यून वार्तापत्र हे उद्दिष्ट नक्की सफल करेल अशी आम्हाला आशा आहे असा विश्वास त्यानी व्यक्त केले.
हिंदी, इंग्रजी आणि मराठीतले अनेक शब्द वापरात न आल्यामुळे कालबाह्य झाले. अशा उपक्रमातून पुन्हा एकदा हे शब्द अस्तित्वात येतील आणि मुलांची भाषा अधिक समृध्द होईल. ‘ठाणेवैभव’ या उपक्रमाद्वारे विशेष सहाय्य करणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे, असे मत ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केले. विचारांचे कृतीत रुपांतर होण्यासाठी शब्दांची मदत लागते, परंतु मुद्रित अक्षरांवर आलेले संकट ही साखळी खंडित करण्याची भीती असल्याचे श्री. बल्लाळ यांनी सांगितले. मुलांना शब्दांच्या दुनियेत रमण्यासाठी त्यांच्यात वाचनाची आणि लेखनाची आवड निर्माण करावी असे ते म्हणाले.
विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि संस्थेचे विशेष आभार मानले. अशा उपक्रमातून शाळेतील सर्व घडामोडी आमच्यापर्यंत सहज पोचण्यास मदत होईल, असे मत एका पालकाने व्यक्त केले तर आम्हला हक्काचे वार्तापत्र मिळाल्यामुळे आम्हाला आवडणारे साहित्य अधिक वाचता येईल याचा आम्हाला वेगळा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने ‘ठाणेवैभव’शी बोलताना दिली.
ब्लॉसम शाळेचा यंदा पुन्हा १०० टक्के निकाल लागला आणि दहावीत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाले. या वेळेस शाळेच्या मुख्याध्यापिका नीलजा पाटील, ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते.