* प्रादेशिक परिवहन विभागाची मोहीम
* ३५ बसेसवर आकारला अडीच लाखांचा दंड
ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने अवैध बस वाहतूक रोखण्यासाठी कंबर कसली आहे. विभागाने आयोजिलेल्या विशेष तपासणी मोहिमेत थकीत करावर जोर देण्यात आला. यात 35 बसेसवर दोन लाख 54 हजार रुपयांचा दंड आकारला. ठाण्यात कळवा, तीन हात नाका आणि नितीन सिग्नल परिसरात १३७ खाजगी बसची तपासणी केली.
विनापरवाना अथवा परवाना अटीचा भंग, जादा प्रवासी आदी वाहतूक नियमांची पायमल्ली करणा-या बस चालकांच्या विरोधात विभागाच्या ‘वायुवेग’ व ‘रस्ता सुरक्षा पथका’ने ३५ बसेसवर दंडात्मक कारवाई केली आहे.
ठाण्यातील अनेक बसचालक निर्धारित केलेल्या वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बस ‘पळवत’ असल्याच्या तक्रारी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या आहेत. विभागाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बसगाड्यांची विशेष तपासणी मोहिम प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबविण्यात आली. या तपासणीत खाजगी बसगाड्यांच्या ३५ चालकांना मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली.
कळवा, तीन हात नाका व नितीन सिग्नल परिसरात केलेल्या १३७ खाजगी बसेसच्या तपासणीत कर थकीत वाहने, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक, जादा भाडे आकारणी, विनापरवाना अथवा परवाना अटींचा भग करून बस चालवणे, बसमधून अवैधरित्या रित्या मालवाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र वैधता संपणे, बसमधील अवैध बदल, अग्निशमन यंत्रणेची आणि आपत्कालीन दरवाजाची तपासणी करण्यात आली. नोंदणी क्रमांक दुसरा वापरुन रस्त्यावर धावणा-या बसगाड्यांवरही कारवाई करण्यात आली. यावेळी आढळलेल्या बसचालकांकडून दोन लाख ५४ हजार रुपये दंड वसूली करण्यात आली.
याशिवाय वाहन चालवताना मद्यपान केले आहे का याचीही ‘ब्रीथ अॅनलायझर’ चा वापर करुन बसचालकांचीही तपासणी केली. यावेळी वायुवेग व रस्ता सुरक्षा पथकाने विशेष कामगिरी बजावली, अशी माहिती प्रसाद नलवडे (सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी) यांनी दिली.
घोडबंदर मार्गावर अवैध वाहतूक सुरूच
घोडबंदर मार्गावरून ठाणे पूर्वेकडे आणि ठाण्यातून घोडबंदर मार्गावर पांढऱ्या रंगाच्या खासगी बस ठाणे परिवहन सेवेच्या थांब्यांवर उभे असलेल्या प्रवाशांची बेकायदेशीरपणे वाहतूक करत आहेत. या बाबत जागर फाऊंडेशन या संस्थेने परिवहन सेवा, वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाला कारवाईबाबत पत्रे दिली आहेत. मात्र गेल्या महिन्याभरात याकडे तिन्ही विभागांचे दुर्लक्ष असून आजही ही बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या व्यवसायाला या विभागांचा पाठिंबा आहे काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.