पावसाची संततधार; शुक्रवारी सायंकाळपर्यंत ७१ मिमी नोंद
ठाणे: शहरात आजही पावसाची संततधार सुरूच होती. संध्याकाळी ७१ मिमी पावसाची नोंद झाली असून मागील वर्षीपेक्षा दुप्पट पाऊस आजपर्यंत पडला आहे. काही सखल भागात पाणी तुंबले होते.
सकाळपासूनच पावसाचा धुमधडाका सुरू होता. दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. संध्याकाळी ६.३० वाजता ठाणे शहरात ७१.३६ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी ६४५.३४ मिमी इतका पाऊस पडला आहे. मागील वर्षी ३२३ मिमी पावसाची नोंद झाली होती. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट पाऊस पडला आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबले होते. वंदना सिनेमा येथे नेहमीप्रमाणे आजही पाणी तुंबल्याने या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती तर अनेक भागात देखील पाणी तुंबले होते, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला होता. लोकल वेळेवर धावत होत्या.
नौपाडा परिसरातील महात्मा गांधी रोड येथील नौपाडा हजेरी शेड येथील १५ फूट संरक्षक भिंत कोसळली होती तर विटावा, घोडबंदर रोड विजय ॲनेक्स आणि राममारुती रोड या तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याची घटना घडली आहे.