२०५४ पर्यंतच्या शहराच्या पाण्याची गरज भागणार
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेची सन 2054 पर्यंतची पाण्याची मागणी पूर्ण होणेसाठी शासनाने सूर्या धरण प्रकल्पातून मीरा भाईंदर शहरासाठी 218 द.ल.ली. पाण्याचे आरक्षण मंजूर केलेले आहे. हे पाणी मीरा-भाईंदर शहरापर्यंत पोहचविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मीरा-भाईंदर व वसई-विरार महानगरपालिकेसाठी 403 द.ल.ली. पाणी पुरवठा योजना राबवत आहे.
सूर्या प्रादेशिक योजनेच्या पाणी पुरवठ्यासाठी घोडबंदर चेणे येथील संतुलन टाकीत प्राप्त होणारे 218 द.ल.ली. पाणी पुढे शहरात आणणे, शहराअंतर्गत वितरण व्यवस्था अंथरणे व उंच जलकुंभ बांधणे इत्यादी अनुषंगीक कामे ही महानगरपालिकेमार्फत करावयाची आहेत. प्रस्तावित योजनेमध्ये 23 उंच पाणी साठवण टाक्या बांधणे, 38 कि.मी. फिडरमेन / मिशनमेन अंथरणे,176 कि.मी. वितरण व्यवस्थेची पाईपलाईन अंथरणे या अतिरिक्त कामाचा रु. 516.78 कोटीचा सुधारीत सविस्तर प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजूरी प्राप्त करुन प्रशासकीय मान्यतेसाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानातंर्गत मंजूरीसाठी सादर करण्यात आलेला आहे.
516.78 कोटी रुपये किंमतीचा सुधारीत सविस्तर प्रकल्प अहवालास शासनाकडून 2 नोव्हेंबर 2022 रोजी मान्यता मिळाली. योजनेच्या कामाकरीता 15 फेब्रुवारी 2023 रोजी ऑनलाईन निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. निविदेस प्रतिसाद मिळून एकूण तीन निविदा प्राप्त झाल्या.मंजूर निविदेनुसार मे. इगल इन्फ्रा इंडिया लि. या न्युनत्तम निविदाधारकास कार्यादेश देण्यात आला आहे. काम पूर्ण करण्याचा कालवधी 24 महिन्याचा आहे. सदर योजना पूर्ण झाल्यानंतर शहराची सन 2054 पर्यंतची पाण्याची गरज पूर्ण होणार आहे.