मेट्रो प्रकल्पाचे ठाण्यातील बॅरिकेड्स हटवले

रस्त्याच्या दुतर्फा मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या

ठाणे : मान्सून दरम्यान निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पासाठी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करून ठाणेकर नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. ‘एमएमआर रिजन’मध्ये मेट्रोतील उन्नत मार्गाची कामे जिथे जिथे झाली आहेत, तेथील बॅरिकेड्स काढण्याचा निर्णय घेतला.
‘एमएमआरडीए’च्या अखत्यारितील रस्त्यावरील खड्डे भरण्यात येत आहेत. पावसाळ्यात पाणी साचेल अशा जागा आधीच लक्षात घेऊन तेथे मोटर पंप लावण्यात आले. अतिवृष्टीमुळे साचलेले पाणी पंपांद्वारे उपसा करून त्याचा योग्य निचरा करता येईल. नागरीकांनी प्राधिकरणाच्या २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षांना संपर्क साधून केलेल्या तक्रारीचे निवारण तात्काळ करण्याच्या सूचना सर्व विभागांना महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिल्या.

सहा मेट्रो प्रकल्पातील एकूण ३३ हजार ९२२ बॅरिकेडस काढल्यामुळे दुतर्फा ८४.८०६ (४२ किमी एकेरी रस्ता) किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. एमएमआरडीए क्षेत्रात सुमारे ३३७ किमी लांब मेट्रोचे जाळे प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे. त्यापैकी ठाण्यात ४, ४ अ यासह अन्य मेट्रो मार्गांसाठी लावलेल्या बॅरिकेड्सपैकी सुमारे ६० टक्के बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी १-१ मार्गिका वाहतूकीसाठी उपलब्ध झाली आहे.

डॉ. मुखर्जी यांनी मुंबई महानगर प्रदेशात प्रगतीपथावर असलेल्या सर्व मेट्रो प्रकल्पातील काम पूर्ण झालेल्या ठिकाणचे बॅरिकेड्स काढून रस्ते पूर्वस्थितीत खुले करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे अनेक महत्वाच्या रस्त्यांचा भाग मोकळा झाल्याने मान्सून दरम्यान नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांसह 13 मोठ्या रस्त्यांसह घोडबंदर रोड, कापूरबावडी, बाळकुम, भाईंदर, ठाणे, तीन हात नाका आदी भागांतील प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो मार्गांवरील हे बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रकल्पाच्या दोन्ही बाजूंची १- १ मार्गिका वाहतुकीसाठी मोकळी करून नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली. कोणत्याही निमार्णाधीन प्रकल्पात नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एका विशिष्ट रुंदीचा भाग बॅरीकेड्स (धातुच्या पत्र्याचे अडथळे) लावून प्रतिबंधित केला जातो. पण तो प्रकल्प पूर्ण होईपर्यंत रस्ता अडवला जातो. त्यामुळे अनेकदा नागरीकांना मोठ्या वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत असल्यामुळे प्राधिकरणाने हा सामाजिक हिताचा निर्णय घेतला शिवाय काही ठिकाणी बॅरिकेड्स ठेवणे अपरिहार्य आहे तेथे रस्त्याची कमीतकमी जागा व्यापतील अशा पद्धतीने लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अशा ठिकाणी आठ किमीहून लांबीचा अधिक रुंद रस्ता उपलब्ध झाला. एकूण ३३५२ बॅरिकेड्स अशा पद्धतीने कमी कमी जागा व्यापतील अशी पुनर्रचना करण्यात आली.

बॅरिकेड्स हटवण्यात आलेल्या काही रस्त्यांचा तपशील

(1) मेट्रो मार्ग ४आणि ४अ / ९० फिट रोड / ३.९९० किमी. एल.बी. एस मार्ग (वेगवेगळ्या तीन ठिकाणी) १५ किमी (2) ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे ..४.७२६ किमी (3) घोडबंदर रोड (वेगवेगळ्या दोन ठिकाणी ..४ किमी. (4) डेपो रोड १.१५४ किमी (5) मेट्रो मार्ग ५ : कापूरबावडी ते बाळकुम नाका १.५५३ किमी…(6) बाळकुम नाका ते अंजूरफाटा ७.५७३ किमी. (7)अंजूरफाटा ते धामणकर नाका २.०३३ किमी…(8)मेट्रो मार्ग ९ ओवारीपाडा जंक्शन ते दहिसर टोल १.६४८ किमी आणि दहिसर टोल ते डेल्टा १.७१० किमी असा आहे.

अवघ्या महिन्याभरात प्राधिकरणातील ३० हजारांहून अधिक बॅरिकेड्स काढले आहेत. दर १५ दिवसांनी मेट्रोच्या कामाचा आणि बॅरिकेड्सचा आढावा घेतला जाईल आणि एखाद्या ठिकाणी काम संपले की लगेचच तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिला जाईल तसेच रस्त्यांलगतचे सर्व बॅरिकेड्स कमीतकमी जागेत लावून जास्तीतजास्त रस्ता रहदारीसाठी मोकळा ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.