‘महावितरण’कडून महत्वाची माहिती
ठाणे : उन्हामुळे गरम झालेले चिनी मातीने बनवलेले ‘इन्सुलेटर’ पावसाच्या पाण्यामुळे तडकून फुटतात. ते फुटल्यामुळे वीज पुरवठा बंद पडतो, अशी महत्वाची माहिती ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी’ दिली आहे.
विद्युत रोधक (‘इन्सुलेटर) फुटल्यामुळे वीजतारा थेट विद्युत खांबांच्या संपर्कात आल्याने विद्युत खांबात वीज तत्काळ प्रवाहित होते आणि ‘अर्थ फॉल्ट’ होतो. तत्काळ विद्युत यंत्रणेच्या उपक्रेंद्रातील ‘रिले’ कडून सेकंदाच्या आत यंत्रणेतील ‘ब्रेकर्स ट्रीप’ होतात आणि विद्युत वाहिनी बंद पडते, जे विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आणि हिताचे असते. अन्यथा वीज खांबांत विद्यूुत प्रवाहित होईल आणि जीवितहानीचा धोका संभावतो, अशी माहिती विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात आली.
पावसाळ्यात वीज खांबावर वीज कोसळल्यामुळे तीव्र उच्च दाबामुळे इन्सुलेटर्स फुटतात आणि विद्युत यंत्रणेतील सुरक्षा कवच असणा-या या इन्सुलेटर्सना तडे जातात व ते फुटतात म्हणून पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढते, अशी जन-पयोगी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. सुरुवातीला पावसात तर हे सर्रास घडत असते. तेव्हा नेमका बिघाड शोधण्याकरीता रात्री-अपरात्री वीज कर्मचा-यांना गस्त घालावी लागते, कसून तपासणी करावी लागते. ती विद्युत वाहिनी कधी रस्त्याकडेने, कधी शेतातून, झाडी वनांतून तर कधी ओढयातून, डोंगरातून गेलेली असते, असे या क्षेत्रातील वरिष्ठ माहितगारांनी सांगितले.
इन्सुलेटर्स म्हणजे काय?
विद्युत वाहिनीवर वीजतारा आणि वीज खांब यात विद्युतरोधक म्हणून चिनी मातीपासून बनवलेल्या साधनांचा वापर केला जातो. ३३ केव्ही /११ केव्ही या विद्युतवाहक उच्चदाब व विद्युत वितरण लघुदाब वाहिन्यात वापरल्या जाणा-या वेगवेगळ्या विद्युत रोधकांना प्रकारानुसार इंग्रजी भाषेत ‘पिन इन्सुलेटर’, डिस्क इन्सुटेलर, ‘सॅकल इन्सुलेटर’ असे संबोधले जाते, अशी माहिती ‘विद्युत वितरण कंपनी’कडून मिळाली.