नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी बाजारात परराज्यातून आणि महाराष्ट्रातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव वधारले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो १८ ते २८ रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो. गुरुवारी बाजारात २८ ते ४० रुपयांनी विक्री होत आहेत तर किरकोळ बाजारात ६० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत.
वाशीतील एपीएमसी बाजारातच टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहे. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे दरवाढ झालेली आहे. बाजारात सध्या राज्यातील टोमॅटो दाखल होत असून बंगळुरूवरुन होणारी आवकही पूर्णतः बंद आहे. त्याठिकाणीही मालाचे दर वधारले असल्याने बाजारात टोमॅटो दाखल होत नाहीत. आधी बाजारात टोमॅटोच्या ४० ते ५० गाड्या दाखल होत होत्या, मात्र आता उत्पादन कमी झाले आहे. एपीएमसीत ५० टक्के आवक असून टोमॅटोच्या २० ते २५ गाड्या दाखल होत आहेत.
मध्यंतरी उत्पादन वाढल्याने टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनाकडे अधिक लक्ष न दिल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात आता मागणी वाढत असल्याने दर वाढत आहेत, असे मत येथील भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.