शहापूर-खोपोली महामार्गावर शेकडो वृक्ष मृत्यूच्या छायेत

वन आणि पर्यावरण विभाग जागे होणार कधी?

शहापूर: शहापूर- पाटगाव-खोपोली या राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या भूसंपादनात हजारो लहान-मोठ्या वृक्षांना आपले बलिदान द्यावे लागले तर शेकडो वृक्ष आपला जीव मुठीत घेऊन जगण्यासाठी संघर्ष करत असल्याचे विदारक चित्र या रस्त्यावरुन प्रवास करतांना दिसत आहे.

एमएसआरडीसीकडे सोपवलेल्या या महामार्गाच्या कामात असंख्य त्रुटी असल्याचे अशिक्षित लोकांच्याही निदर्शनास आले आहे. तथापि सदर राष्ट्रीय महामार्ग करताना हजारो झाडांचे अडथळे दूर करण्यात आले. परंतु रस्त्याला बाधा न आणणा-या पळस, ऐन, मोह, धावडा आणि आंबा अशा असंख्य उपयोगी वृक्षांना फासावर लटकावल्याचे वेदनादायी चित्र दिसत आहे.

७ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आलेल्या शहापूर-खोपोली महामार्ग क्र.५४८ या ९१ किलोमीटर लांबीच्या आणि अंदाजे ८५० कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित असलेल्या या महामार्गाचा मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. मात्र तब्बल पाच वर्षानंतरही हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने प्रशासकीय यंत्रणेचे वाभाडे निघत असले तरी झोपेचे सोंग घेणाऱ्या पर्यावरण विभागाला देखील याची काडीमात्र खंत वाटत असल्याचे दिसत नाही.

रस्त्याच्या खोदकामामुळे माती ढासळल्याने ते वृक्ष रस्त्यावर पडून गंभीर अपघात होऊ शकतात. हे वृक्ष न तोडता त्यांना कट्टा बांधून काँक्रिटने मजबूत करावेत. अन्यथा आधार नसलेले हे वृक्ष ढासळले तर मानव जातीचे स्वास्थ्य ढासळण्यास वेळ लागणार नाही.