अत्युत्कृष्ट पंचायत समित्यांमध्ये शहापूर तिसऱ्या स्थानी

ठाणे: यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये पंचायत समिती शहापूरला तृतीय क्रमांकाचा अत्युत्कृष्ट पंचायत समिती म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे.

सन २०२१-२०२२ या अहवाल वर्षामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर अशा दोन स्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” ही अभिनव पुरस्कार योजना यावर्षी देखील राबविण्यात आली होती. सदर अभियांनातर्गत राज्यातील तीन पंचायत समित्यांची पुरस्कारासाठी राज्य स्तरावर निवड करण्यात येते व विभाग स्तरावर तीन पंचायत समित्यांची निवड करण्यात येते. यामध्ये पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समित्यांची निवड केली जाते.

पंचायत समितीच्या किमान सभेचे आयोजन करणे, पंचायत समिती रचना व कार्यपध्दती, कर्मचारी व्यवस्थापन, अंगणवाडीतील मूलभूत सुविधा/ परिसर सुधारणा, आरोग्य विभागाकडील प्रसुतीपुर्व नोंदणी व तपासणी, संस्थात्मक प्रसुती, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, ग्रामीण गृह निर्माण (प्रधानमंत्री आवास योजना/ शबरी आवास येाजना/ रमाई आवास योजना इत्यादी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदारी मुक्त गाव, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, बेसलाईन सर्व्हे बाहेरील कुंटुंबाचे शौचालय बांधकाम, म.ग्रा.रो.ह. योजना अंतर्गत मनुष्य दिवस निर्मिती यासारख्या कामामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या तसेच शिक्षण विभागाकडील शालेय आरोग्य तपासणी, जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करणे, ग्रामपंचायत करवसुली ,शाश्वत विकास ध्येय व जिल्हा परिषद विकास आराखडा अशा विविध विकास कामांमध्ये उल्लेखनिय काम केल्याबद्दल पंचायत समिती शहापूरला कोकण विभागीय स्तरावराचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेला आहे.

तालुक्यातील आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास कक्ष, म.ग्रा.रो.ह.यो, कृषी व पशुसंवर्धन या विभागाकडून जनतेची कामे अधिक कार्यक्षमतेने व सर्व प्रशासनाकडून जलदगतीने काम होण्यासाठी मी कटीबध्द राहिन, असे गटविकास अधिकारी, शहापूर यांनी प्रतिपादन केले.