कामांची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
ठाणे : राज्य शासनाकडून आलेल्या निधीच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी रस्त्यांची कामे सुरु असून ही कामे मिळावीत यासाठी १६ टक्क्यांचे वाटप झाल्याचा गंभीर आरोप आरोप ठाणे काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे १६ ते १० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा भरण्यात आल्या असून रस्त्यांच्या कामांची तसेच या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करणार असल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल ६०५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे . यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी २१४ कोटी तर दुसऱ्या टप्प्यासाठी ३९१ कोटींची तरतूद करण्यात आली असून दोन्ही टप्प्यांची कामे ही एकाच वेळी सुरु करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या कामांची ३१ मे ही शेवटची मुदत होती मात्र ही मुदत देखील संपली असून अजूनही रस्त्यांची कामेही अर्धवटच असल्याचे समोर आले आहे. असे असताना आता रस्त्यांच्या कामातही अनियमितता झाली असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.
रस्त्यांची कामे विशिष्ट ठेकेदारांना मिळावीत यासाठी निविदा भरताना १६ ते १० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा भरण्यात आल्या असून ही कामे मिळावी यासाठी १६ टक्क्यांचेही वाटप झाले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. दुसरीकडे रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबतही प्रश्चचिन्ह उपस्थित करत या सर्व कामांची छायाचित्रे काढण्यात आली असून कामांची पोलखोल देखील लवकरच करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
विकासकामांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः करतात. मुख्यमंत्र्यांसोबत आमदार फिरले तर आम्ही समजू शकतो, मात्र त्यांच्यासोबत इतरही काही जण फिरत असून या कामांचे श्रेय घेणारे हे कोण असा प्रश्न उपस्थित करत चव्हाण यांनी थेट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर (शिंदे गट) टीका केली आहे.