डोंबिवली : तलावात बुडून बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास डोंबिवलीजवळील दावडी गावदेवी मंदिराजवळ घडली. बहीण-भाऊ डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगर परिसरातील होते. पोलिसांना तरुणाच्या खिशातील लायसन्स मिळाले होते. यातील तरुण हा डॉक्टर होता तर त्याच्या बहिणीला १०वीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळाले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती रविंद्रन (१५) आणि रणजित रविंद्रन (२३) असे मृत पावलेल्या भाऊ-बहिणीचे नाव असून ते डोंबिवली पश्चिम उमेशनगर परिसरातील रहिवासी असून ते साई श्रद्धा चाळीत राहत होते.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन विभाग, पोलीस व ग्रामस्थ पोहोचले. दोघांचा मृतदेह तलावातून बाहेर काढल्यानंतर रणजितच्या खिशात पोलिसांना लायसन्स सापडले. हे लायसन्स त्याच्या आईचे होते. रणजित आणि कीर्ती हे दोघे रविवारी दुपारी कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी दावडी गावाजवळील गावदेवी मंदिरालगत तलावात उतरले. मात्र दोघांचा पाय घसरून तलावात बुडून मृत्यू पावले. ही माहीती मिळताच माजी नगरसेवक जालिंदर पाटील, ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. या दोघांचा मृतदेह पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आला.डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगर परिसरातील गुरुसाईचरण इमारतीत आई-वडील आणि दोघे मुले रणजित आणि कीर्ती हे कुटुंब राहत होते. त्यांची आई उमेशनगर मधील साईश्रद्धा चाळीत ट्युशन घेत असे. आईवडील गावी गेले होते.