परिषा सरनाईकांची आजीच्या भूमिकेत आयुक्तांकडे कैफियत

ठाणे: महापालिकेच्या उद्यानांतील तुटलेली खेळणी, उद्यानाच्या दुरवस्थेबरोबर मद्यपी, गर्दुल्ल्यांमुळे लहान मुलांवर होणाऱ्या विपरित परिणामाची भीती लक्षात घेऊन, शिवसेनेच्या माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी एक आजी म्हणून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे कैफियत मांडली. तसेच या उद्यानांची निगा राखण्याबरोबरच गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षारक्षक किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आग्रही विनंती केली आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्र. ५ मधील शिवाई नगर येथील श्रीनिवास खळे उद्यानात माजी नगरसेविका परिषा सरनाईक नातवाला घेऊन फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी उद्यानाची दुरवस्था व तुटलेली खेळणी पाहिली. या उद्यानातील हिरवळ गायब झालेली होती. इतकेच नव्हे
तर उद्यानातील एका कोपऱ्यामध्ये काही मुले-मुली खुलेआमपणे मद्यपान व धुम्रपान करीत होते. ते पाहून त्या उद्यानातून लगेचच बाहेर पडल्या. “माझ्या नातवाला हक्काचे विरंगुळ्याचे काही क्षण देऊ शकले नाही, याचे खूप वाईट वाटले. माझ्याप्रमाणेच अनेक माता-भगिनींनाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल. त्यामुळे या उद्यानांमध्ये कायमस्वरुपी सुरक्षारक्षक वा सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आग्रही मागणी परिषा सरनाईक यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

शिवाईनगरप्रमाणेच शहरातील अनेक उद्यानात मद्यपी, गर्दुल्ले, धुम्रपान करणारी मुले-मुली, पाळीव कुत्रे घेऊन येणाऱ्या व्यक्ती यांच्या वावरामुळे लहान मुले, महिला आणि कुटुंबांना त्रास होतो. अशा वातावरणाचा सामान्य नागरिकांना संकोच वाटतो. त्यामुळे ते उद्यानात येण्याचे टाळतात. अशी परिस्थिती बदलण्याची गरज आहे, असे माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.