जूनच्या पहिल्या आठवड्यात भूमिपूजन
ठाणे: तब्बल दहा वर्षे केवळ चर्चेचे आणि कार्यवाहीचे गुर्हाळ सुरू असलेल्या बहुप्रतिक्षित ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला अखेर मूर्तस्वरुप मिळण्याची घटीका समिप आली आहे. सरकारी आणि सुविधा भुखंड अशा सुमारे ४०हजार चौरस मिटर भुखंडावर नवी वसाहत बांधण्यात येणार असून आधी तेथे इमारती बांधून लाभार्थ्यांना थेट चाव्या देण्याची योजना आहे.या पहिल्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या किसननगरचे रहिवासी असून त्यांच्यासाठी क्लस्टर इमारतीच्या पायाभरणीच्या भुमीपुजनाचा मुहूर्त जुनच्या पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारत दुर्घटनेच्या मालिका लक्षात घेता २०१३ साली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्यात आली. त्यामुळे धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहणार्या नागरिकांना दिलासा मिळाला. पण ही योजना या ना त्या कारणामुळे गेली दहा वर्षे रेंगाळत चालली. धोकादायक इमारतींमधील नागरिकांच्या पुर्नवसनासाठी ठाणे महाापलिका प्रशासनाने ४६ युआरपी तयार केल्या. त्यामध्ये किसननगर, हाजुरी, राबोडी, लोकमान्यनगर, टेकडी बंगला आणि कोपरी या युपीआरला पहिली मंजुरी मिळाली आहे. या भागातील नागरिकांचे सर्वेक्षणदेखील करण्यात आले आहे. विशेष म्हणचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या किसननगर येथे क्लस्टर डेव्हल्पमेंटचे भुमीपुजनही काही वर्षांपूर्वी झाले. पण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी खासगी विकासक पुढे येत नसल्याने अखेर पालिकेने सिडकोची मदत घेतली आहे.
सिडकोसोबत महापालिकेने सामंजस्य करार केल्यानंतरही हा प्रकल्प संक्रमण शिबिरांमुळे रखडत असल्याचे पुन्हा लक्षात आले. संक्रमण शिबिरे बांधून रहिवाशांचे तात्पुरते पुर्नवसन करण्यात आणखी कालावधी जाणार हे निश्चित झाल्यानंतर त्यावर तोडगा म्हणून रहिवासी इमारती खाली न करता आधी त्यांच्यासाठी भुखंड निश्चित करून वसाहत उभारण्याचे ठरवण्यात आले. ठाणे महापालिकेच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार ठरल्याप्रमाणे किसननगरसाठी ही पहिली योजना राबवण्यात येणार असल्याने या परिसरालगत असलेल्या मुंबई महपालिकेचा ७७ गुंठे भुखंड हस्तांतरित करून घेण्यात आला आहे. तसेच दोस्तीचा अडीच एकरचा सुविधा भुखंडही ताब्यात आला आहे. प्रत्येक भुखंडावर २० हजार चौरस मीटर म्हणजे प्रत्येक भुखंडावर सुमारे ४ लाख चौरस फुटाचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
विकसित करण्यात आलेल्या भुखंडावर टोलजंगी टॉवर उभारण्यात येणार आहेत. या फ्लॅटच्या थेट चाव्या क्लस्टरच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. या विकसित भुखंडावर टाऊनशिपप्रमाणे शाळा, रुग्णालये, उद्याने इत्यादी सुविधा असणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकल्प पुर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांना सध्या ते राहत असलेले घर सोडण्याची गरज भासणार नाही. तर येत्या काही वर्षांमध्ये थेट नवीन घरातच गृहप्रवेश मिळणार आहे. याचे मानकरी पहिले किसनसनगरवासिय ठरणार आहेत.
भूमिपूजनाची तात्पुरती तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र ती अद्याप जाहिर करण्यास सुत्रांनी नकार दिला असला तरी हा मुहूर्त जूनच्या पहिल्याच आठवड्यात असणार आहे. त्यानंतर तातडीने प्रत्यक्ष इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.