बारावी परीक्षेत मुलींचा वरचष्मा

ठाणे जिल्ह्याचा ८८.९० टक्के निकाल

ठाणे: उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. ९१.३६ टक्के मुली तर ८६.६८ टक्के मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल ८८.९० टक्के इतका लागला आहे.

मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यात ५१,७९१ मुलगे तर ४६,९०५ मुली अशा एकूण ९८,६९६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४२,८५३ मुली आणि ४४,८९६ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखेत १८,३९१ मुलगे आणि १५,५०२ मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी १७००५ मुलगे आणि १४,४९४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. वाणिज्य शाखेत २५,९८५ मुलगे आणि २२,६६१ मुली परिक्षेला बसल्या होत्या. त्यामधून २२,६०५ मुलगे आणि २०,८१० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. कला विभागात ६,८४३ मुलगे आणि ८४११ मुली परीक्षेला बसलेल्या होत्या. त्यापैकी ७,२३६ मुली आणि ४,७३९ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. व्यावसायिक शाखेत ३२६ मुलगे तर २८६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तंत्रज्ञान शाखेत २२३ मुलगे आणि २७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.