ठाण्यातील ६३ वर्षे जुनी व्यायामशाळा टाकणार कात

ठाणे: ठाण्यातील भांडार आळी येथील ६३ वर्षे जुन्या होतकरू व्यायामशाळेचे रुपडे लवकरच पालटणार असून नवीन भव्य वास्तूचा भूमिपूजन सोहळा नुकताच दिमाखात झाला.

ठाण्याच्या जडघडणीत शहरातील जुन्या मंडळांचे मोलाचे योगदान आहे. या मंडळांच्या वास्तूमधून अनेक खेळाडू घडले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार ठाणे शहर बदलत आहे, तसे या वास्तूंचे नूतनीकरणही होत आहे. ठाण्यातील भांडार आळी येथे १९६१ साली उभ्या राहिलेल्या होतकरू व्यायाम शाळेचा कायापालटही आता होणार आहे. माजी उपमहापौर पल्लवी कदम आणि शिवसेना विभागप्रमुख माजी नगरसेवक पवन कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने यासाठी निधीही उपलब्ध करून दिला.

या होतकरू व्यायामशाळेच्या नूतन वास्तू उभारणीचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रवक्ते, समन्वयक माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिवसेना उपनेते दशरथ पाटील, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, परिवहन समिती सभापती विलास जोशी, शिवसेना शहर संघटक अशोक वैती, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय वाघुले, भाजपचे चिटणीस जयेंद्र कोळी, काँग्रेस सचिव सचिन शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रनवरे, माजी नगरसेविका नम्रता कोळी, ठामपा उपायुक्त मिनल पालांडे, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ठाकूर, सेक्रेटरी गणेश म्हात्रे, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विभागातील शिवसैनिक, नागरिक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.