३७७वेळा मोटारसायकली अंगावरून गेल्या
बाईक ३७७ वेळा पोटावरुन घेऊन जाण्याचा काल रविवारी विश्वविक्रम करणारे पंडित धायगुडे सोमवारी सकाळी वेळेत कामावर हजर राहीले. विक्रम करण्याच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच त्यांची कामावरील निष्ठाही कौतुकास्पद आहे.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात तपासणी विभागात शिपाई या पदावर कार्यरत असलेले श्री. धायगुडे हे कळंबोली येथून वेळेत कामावर हजर झाले होते. कार्यालयातील नियमित कामे त्यांनी दिवसभरात पूर्ण केली होती. त्या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या विश्व विक्रमाबद्दल अभिमान वाटत आहे.
श्री. धायगुडे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, पोटावरुन ट्रक घेऊन जाण्याचा विक्रम करण्याबाबत २०१४पासून सतत पत्रव्यवहार करून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेला कळवले होते, परंतु त्यांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे २०१६ साली मोटर बाईक घेऊन जाण्याची परवानगी मागितली होती, परंतु अडीचशे किलोपेक्षा जास्त वजनाची बाईक असावी अशी अट गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बुकने घातली होती, त्यामुळे अशा बाईक शोधून काढणे मोठे दिव्य होते. अंधेरी येथील एक कंपनी अशा गाड्या देते, असे समजले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना गाड्या पोटावरुन घेऊन जाणार असल्याची माहिती दिली असता त्यांनी नकार दिला. वैद्यकीय प्रमाणात आणि सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना करून प्रथम चाचणी घेण्यात येईल, त्यामध्ये जर यशस्वी झाले तरच गाड्या मिळतील, असे सांगितले होते. चाचणीमध्ये गाड्या अंगावरून गेल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पाहताच त्यांनी सत्यप्रतिज्ञापत्र फाडून टाकले आणि गाड्या उपलब्ध करून दिल्या, असे श्री. धायगुडे यांनी सांगितले. हा विश्वविक्रम पाहण्यासाठी गाड्या पुरविणारे मनन पटेल हे परिवारासह बेंगळुरू येथून आले होते. सर्वात जास्त ३५० किलो वजनाची बाईक ही त्यांच्या मालकीची असून सर्वात शेवटी ती पोटावरुन गेल्याचे श्री. धायगुडे म्हणाले.
पत्नी आणि दोन मुले असा छोटासा परिवार असलेल्या धायगुडे यांच्या पत्नीने काळजीपोटी अशा प्रकारच्या जीवघेण्या विक्रमाला नकार दिला होता, मात्र जेव्हा विक्रम केला तेव्हा मात्र पत्नी आणि मुले खुश झाली. त्यांनाही अभिमान वाटल्याचे श्री. धायगुडे म्हणाले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तपासणी विभागातील अधिकारी डॉ. प्रकाश भोदिवले यांनी देखील त्यांच्या विश्व विक्रमाबद्दल श्री. धायगुडे यांचे कौतुक केले आहे. हा पराक्रम केला तरी ते आज वेळेत कामावर हजर झाले आहेत, त्यांची कामावर निष्ठा आहे. कामाला ते दांडी कधी मारत नाहीत. त्यांचे आहारावर नियंत्रण असून आमच्या बरोबर डबा खातात. परंतु त्यांचा आहार पोषक असल्याचे ते म्हणाले. अतिशय प्रामाणिक असलेले धायगुडे हे आणखी काही नवीन विक्रम करतील, असा विश्वास डॉ. भोदिवले यांनी व्यक्त केला.