भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेद्वारे मागील वर्षापासून शहरातील नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्याबाबत सूचनांसह भित्तीपत्रके पारित केली आहेत. मात्र अद्यापही काही व्यावसायिक संस्था महापालिकेच्या सूचनेचा अनादर करीत ओला व सुका कचरा एकत्रित करीत असल्याने पालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पूर्वेच्या फॅमिली केअर हॉस्पिटलमधील दैनंदिन ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करीत नसल्याने प्रभाग क्रमांक ४ च्या वतीने स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या टीममार्फत हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर इंद्रलोक पोलीस चौकी रोडजवळील रस्त्यावर जाणारी अवजड वाहने ट्रक, डंपर, यांच्या वाहतुकीने रस्त्यावर घाण, गाळ, ओल्या मातीचे ढीग इत्यादी मटेरियल पडत असल्याने रस्ता खराब होऊन अस्वच्छता पसरत असल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करत पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई प्रभाग समिती क्रं. ४ अंतर्गत स्वच्छता निरीक्षक प्रकाश पवार, रविंद्र पाटील, मनपा मुकादम जयसिंग सोळंकी, ठेका मुकादम कल्पेश गुरव, राजेश दिवेकर, रत्नाकर घरत यांनी केली आहे.