ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला पाच महिने उलटल्यानंतरही अद्याप शहरातील शौचालयांच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नसून केवळ निविदा प्रक्रियेचे कागदी घोडे नाचवण्याचे काम प्रशासनाकडून काम सुरु आहे. विशेष म्हणजे शौचालयांच्या दुरुस्तीला शंभर टक्के निधी मिळूनही अद्याप दुरुस्तीलाच सुरुवात करण्यात आलेली नाही.
‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या संकल्पने अंतर्गत ठाणे महापालिकेने शहरातील सार्वजनिक शौचालयांचा सर्व्हे केला असून त्या नुसार ९०० पैकी ७०० शौचालयांची दुरुस्ती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मार्च महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याच महिन्यात शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार होती. मात्र अद्याप काही शौचालयांच्या दुरुस्तीची निविदा काढण्यात आली आहे तर काहींची अद्याप काढण्यात आलेली नाही. त्यामुळे या शौचालयांच्या दुरुस्तीला कधी मुहूर्त लागणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शौचालयांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून २५ कोटी, महापालिकेच्या मागासवर्गीय निधीतून १३ कोटी, अण्णाभाऊ साठे योजनेतून ९.०५ कोटी, आणि नगरविकास विभागाकडून २५ कोटी अशा स्वरुपात या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
शहरातील ७०० शौचालयांपैकी काही शौचालयांची किरकोळ तर काही शौचालयांची मोठ्या स्वरुपाची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये दरवाजे, खिडक्या, पाण्याच्या टाकी बसविणे, कडी कोंयडा बसविणे, वीजेची सुविधा आदींसह इतर कामे यात केली जाणार आहेत.