ठाणेकरांना लोड शेडींगमुक्त उन्हाळ्याचा अनुभव
ठाणे : उन्हाळ्याच्या एप्रिल आणि मे महिन्यात दरवर्षी वीज पुरवठा खंडित होण्याचा अनुभव असताना यंदा मात्र एप्रिलमध्ये विनाखंड वीज पुरवठा झाला तर मे महिन्यातही सुयोग्य नियोजनामुळे अखंड वीज मिळणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
गेल्या दोन वर्षांपासून ठाणेकरांना उष्म्याचे चटके बसत असले तरीही लाखो ग्राहकांना विनाखंडीत वीज मिळत असल्यामुळे ते ‘एमएसईडीसीएल’चे वरिष्ठ अधिकारी आणि विविध स्तरावरील कर्मचा-यांना दुषणे देत नाहीत, असे चित्र दिसत आहेत. वीजपुरवठा करणा-या सर्व यंत्रणांची वेळोवेळी देखभाल आणि त्याकरीता असलेल्या प्रोटोकॉलही काटेकोरपणे पाळणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची मेहनत फळास आली आहे.
गेल्या वर्षीही ‘सूर्यमहाराज’ खुप तळपत होते. त्यावेळी काही ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांनी वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी देण्यासाठी वीज पुरवठा कार्यालयांशी संपर्क साधून वीज केव्हा सुरु होणार, अशी विचारणा सातत्याने केली होती. याचा मागोवा ‘एमएसईडीसीएल’च्या वरिष्ठ अधिका-यांनी व त्यांच्या सहकारी यांनी घेतला. अशा घटनांना टाळण्यासाठी ‘महावितरण’च्या ठाण्यातील वरिष्ठ अधिका-यांनी ठाणे नागरी मंडळांतील सहकारी अधिका-यांच्या यासंबंधी बैठका घेतल्या होत्या.
त्यावेळी वीजपुरवठा करणा-या उच्चदाब वाहिनी, विविध क्षमतेच्या रोहित्रांची क्षमता, त्यांची वर्गवारी आणि तेथील एकूण ग्राहक संख्या, तेथील आस्थापनांची, अतिउच्च दाब उपकेंद्रांची संख्या आणि ग्राहकांपर्यंत पोहचणारी वितरण उपकेंद्रे यांची माहिती संकलित करताना किती उपकेंद्रांची किती क्षमता आहे, याच्या माहितीचे संकलन केले. त्यावेळी ठाणे महापालिका अंतर्गत ठाणे एक व ठाणे दोन / वागळे इस्टेट आणि ठाणे नागरी मंडळ यांची माहिती संकलित केल्यामुळे चित्र स्पष्ट झाले. वितरण उपकेंद्रांमध्ये 22 / 11 केव्ही उपकेंद्रांची आणि 22 केव्ही स्विचिंग उपकेंद्रांची आकडेवारी स्पष्ट झाली आहे.
ठाणे नागरी मंडळात 22 केव्ही आणि 11 केव्ही उच्चदाब वाहिनी तसेच एकूण उच्चदाब वाहिनींची लांबी आणि लघुदाब वाहिनींची संख्या आहे. यासोबत वीज पुरवठ्यासाठी ठिकठिकाणच्या रोहित्रांची क्षमता वेगवेगळी असली तरी, आत्तापर्यंत ठाणे महापालिकेच्या कार्यकक्षेतील विविध प्रकारचे रोहित्र कार्यरत आहेत.
मनुष्यबळ तोकडे असूनही 24 तास वीज अखंडीत
विस्तीर्ण पसरलेल्या ठाण्यातील रहिवाशांना विनाखंडीत 24 तास मिळण्यासाठी ठाणे एक आणि ठाणे दोन व वागळे इस्टेट येथील मनुष्यबळ (मॅनपॉवर) तोकडे असले तरीही ठाणे (यु) मध्ये अवघे 66 अभियंते, कार्यालयीन मनुष्यबळही अवघे 288 आणि आऊटसोर्सिंग केलेले मनुष्यबळ 197 इतके आहे. घरगुती लघुदाब आणि घरगुती उच्चदाब यांसह उर्वरित 14 विविध वर्गवारीत मिळून ग्राहकांची आणि अन्य वर्गवारीतील ग्राहकांची एकूण संख्या चार लाख 87 हजार 545 इतकी आहे.
दरवर्षी पावसाळ्याआधी म्हणजे उन्हळ्यात ठाणे 1, ठाणे 2 आणि वागळे इस्टेटमध्ये तब्बल 41 मेहनतीची कामे करण्यात येतात. उन्हाळा कडक असूनही पीन इन्सुलेटर, डिस्क इन्सुलेटर, टॉपिंग ऑफ ऑईल ऑफ ट्रान्सफॉर्मर बदलणे, खराब झालेले जंपर, वीजेचे तुटलेले खांब बदलणे, फॉल्टि सर्व्हिस वायर्स, खराब झालेले कंडक्टर्स अशी कामे अभियंता, लाईनमन आणि कर्मचारी उन्हात उभे राहून करत असतात.
पावसाळ्यात वीजा चमकून त्या उपकेंद्रांवर पडल्यास त्याला विरोध करणारी यंत्रणा आणि दुरुस्ती, देखभाल अशी एकूण 41 कामे अभियंता आणि कर्मचारी 12 महिने करत असल्यामुळे ठाणेकरांना अखंडीत वीज पुरवठा होत आहे.