तीनहात नाका-माजिवडा सेवा रस्त्यावर पार्कींग व्यवस्था

ठाण्यात समांतर पार्कींगचा प्रयोग

ठाणे: पुरेशा वाहनतळाच्या अभावामुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणाऱ्या ठाण्यात वाहतुक पोलीस विभागाने सेवा रस्त्यांवर समांतर पार्किंगचा उतारा शोधला असून त्याचा फायदा होत असल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. त्यानुसार तीन हात नाका ते माजिवडे सेवा रस्त्यावर इमारतींच्या बाजूने वाहने उभी करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या मुळे या पट्ट्यातील वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहे.

शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर तसेच सेवा रस्त्यांवर समांतर पार्कींगचा प्रयोग राबवला जात आहे. वागळे इस्टेट, इंदिरा नगर ते नितिन कंपनी, पासपोर्ट कार्यालयाच्या समोरील रस्ता अशा ठिकाणी समांतर पार्कींगची संकल्पना यशस्वी झाली आहे. यामुळे वाहतुक कोंडी देखील होतांना दिसत नाही. आता तीनहात नाका ते माजिवडे येथील सेवा रस्त्यावर देखील समांतर पार्कींगची संकल्पना पुढील पाच दिवसात सुरु होणार आहे. सेवा रस्त्यावर इमारतींच्या बाजूचा रस्ता यासाठी निवडण्यात आला आहे. त्यानुसार रस्त्याच्या एकाच बाजूला पार्कींगची सुविधा दिली जाणार आहे. जेणेकरुन ठाणेकरांना त्याठिकाणी मोफत पार्कींग उपलब्ध होणार आहे.
ठाण्यात पार्कींगची समस्या मोठी आहे. परंतु महापालिका आणि वाहतुक पोलिसांनी केलेल्या काही प्रयोगामुळे वाहतुक कोंडी कमी होण्यात मदत झालेली दिसून आली आहे.

वागळे इस्टेट येथील रोड नंबर १६, २२, नेपच्युन, पासपोर्ट कार्यालय आणि इंदिरा नगर ते नितिन कंपनी आदी रस्त्यांवर महापालिकेने समांतर पार्कींगचा प्रयोग राबिवला होता. त्याला चांगले यश आल्याने येथील वाहतुक कोंडीचीही समस्या जवळपास मार्गी लागली आहे. या भागातील रस्त्याच्या एका बाजूला समांतर पार्कींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु त्याव्यतीरिक्त इतर ठिकाणी उभ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.

दरम्यान आता तिन हात नाका ते माजिवडे जंक्शन उजव्या बाजूकडील जो सेवा रस्ता आहे, त्याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्कींग होत होती. त्यामुळे सांयकाळच्या सुमारास या रस्त्यावर देखील वाहतुक कोंडी होतांना दिसत होती. तसेच पुढे गॅरेजवाले, शोरुम वाल्यांच्या लागणाऱ्या गाड्यांमुळे देखील त्याचा त्रास इतर वाहन चालकांना सहन करावा लागत होता. परंतु आता येथील रस्त्यावर देखील समांतर पार्कींग एका बाजूला उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सूचना फलक लावल्यानंतर पार्कींगची सुविधा सुरु केली जाणार आहे. रस्त्याच्या एका बाजूला पार्कींग झाल्याने दुसरी बाजू मोकळी होणार आहे. तसेच महामार्गाला उभी करण्यात येणारी वाहने देखील काढली जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा ठाणेकरांना होणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.