ठाणेकर रोज पाडताहेत हजारो किलो आईसक्रिमचा फडशा!

ठाणे: उकाड्याने हैराण झालेले ठाणेकर घशाची कोरड दूर करण्यासाठी दिवसाला सुमारे पाच टन आईस्क्रीम फस्त करत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जसजसे शहराचे तापमान वाढेल तसे आईस्क्रीमची मागणीही वाढणार असल्याचे आईस्क्रीम विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

ठाणे शहराचे तापमान मागील काही दिवसांपासून ३८अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आढळून येत आहे. दुपारच्या वेळेत ठाणेकरांनी घराच्या बाहेर पडणे बंद केले आहे. वातानुकूलित यंत्राचा वापर देखील वाढला आहे. त्याचबरोबर दुपारी आणि रात्री जेवणाच्यानंतर आईस्क्रीम खाण्याकडे ठाणेकरांचा कल वाढला आहे. दुपारी पार्सल आईस्क्रीम मागवली जात आहे तर रात्रीच्या वेळी आईस्क्रीमच्या दुकानात खवय्यांची गर्दी वाढत असल्याचे चित्र तलावपाळी, नौपाडा, पाचपाखाडी, घोडबंदर रोड, पूर्व ठाणे, वर्तकनगर, किसननगर आदी भागातील आईस्क्रीमच्या दुकानांवर दिसत आहे. त्याचबरोबर बारसे, मुंज, साखरपुडा, विवाह आदी समारंभातही आईस्क्रीमवर अधिक भर दिला जात असल्याचे कॅटरर्स सांगत आहेत.

ठाणे तलावपाळी जवळील क्रिमचिल्स कंपनी ही २० वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे, असे गणेश कुठपाडी यांनी सांगितले. आमच्या येथे विविध चवींची बेस्ट आईसक्रीम मिळतात. कमीतकमी ५० रुपयांपासून ३०० रुपयांची विविध आईसक्रीम असल्यामुळे ग्राहक खुष होतात. लहानपासून ते एक लिटर्सची आईसक्रीमची येथे विक्री होते. साखर रहित आईसक्रीमही आमच्याकडे मिळत असल्याने असे ग्राहकही हमखास येतात.

गडबड, फज, हार्ड चॉकलेट, अमेरिकन मॅजिक, सो.को.ला, मँगो मस्तानी, फेरो रोश, बेरी ब्लास्ट, आंबा, मँगो मस्तानी, दिलखुश, डाय हार्ड, व्हॅनिला आदी आईसक्रीम्सनाही मागणी आहे. तसेच ज्या ग्राहकांना ‘शुगर’असते त्यांच्यासाठीही व्हॅनिला, स्ट्रॉबेरी , अंजीर आईसक्रीम येथे नक्कीच मिळतात. अशी माहिती सेनी कुमार आणि धीरु चव्हाण यांनी दिली.

ठाणे पूर्वेला ‘अमुल’च्या विविध चवीची आईसक्रीम्सची विक्री गेल्या ३० वर्षांपासून करणा-या विक्रेत्याने सांगितले की, यंदाच्या उन्हाळयात अमुलच्या विविध आईसक्रीमची जोरदार विक्री झाली आहे. आईस कँडी, वेगवेगळे कोन, मध्यम आणि मोठ्या आकारांच्या पॅक्सची विक्री झाली. लॉलीपॉप, काला खट्टा, कच्ची कैरी, आॅरेंज, लेमन आदींच्या कॅँडीनाही मागणी होती. तर ३० ते ४० आणि ३५ ते ५० रुपयांच्या मध्यम आकारांच्या कोनना मागणी होती. बटरस्कॉच, ब्राऊनी, ब्लॅक करंट, केशर पिस्ता या पारंपारिक आईसक्रीमनाही मागणी होती.
‘अमुल’च्या कुल्फी ३० ते ४० रुपयांच्या मर्यादेत असल्यामुळे त्यांची अधिकाधिक विक्री झाल्याची माहिती विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा खुपच तापदायक असल्याने ग्राहक क्वचितच बाहेर पडतात. मात्र सायंकाळी ७ पासून ते रात्री ११.३० वाजेपर्यंत दररोज गर्दी असते, असे त्यांनी सांगितले.