येऊरमध्ये रात्रीचा गोंधळ बंद

डीजे, तीव्र रोषणाई, खेळ, पार्ट्यांवर निर्बंध

ठाणे : येऊरमध्ये रात्री ११ नंतर प्रवेश बंदी करण्यासोबतच विद्युत रोषणाई, ध्वनी प्रदूषण यावरही बंदी घालण्यात आली आहे. ११ नंतर कोणतेही समारंभ होणार नाहीत याची जबाबदारी पोलीस आणि वन अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. गुरुवारी अतिथीगृहावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत.

अतिथीगृहात सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, पालिकेचे अधिकारी, पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी घेतलेल्या निर्णयानुसार रात्री ११ नंतर येऊर येथील प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. तीव्र प्रकाशाची रोषणाई बंद करण्यात येईल, वेळप्रसंगी टर्फही उखडून टाकण्यात येणार आहेत. ध्वनी प्रदूषण होणार नाही. रात्री १० नंतर लग्न किंवा इतर समांरभही होणार नाहीत.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केल्यानंतर ठाण्यात पालिका प्रशासनाने तत्काळ कारवाईची मोहीम हाती घेतली. येऊर येथील राजकीय नेत्यांचे बंगले आणि हॉटेलच्या नळजोडण्या ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तोडून दणका दिला आहे. आज पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता मुरलीधर भोये यांच्या पथकाने २५ नळजोडण्या तोडण्याची कारवाई केली. त्यामध्ये हॉटेल अर्बन व्हिलेज, जंगल रिसॉर्ट, एक्झोटिका या हॉटेलसह सर्वपक्षीय नेते आणि श्रीमंतांच्या बंगल्याचे पाणी तोडण्यात आले आहे.