नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेने ऐरोली सेक्टर 15 येथे उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक देश-परदेशातील विविध स्मारकांपेक्षा अत्यंत आगळे वेगळे सर्वोत्तम ज्ञानस्मारक असल्याचे अभिप्राय स्मारकाला भेट देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांप्रमाणेच लाखोंच्या संख्येने स्मारकाला भेट देणा-या सर्वसामान्य नागरिकांनी दिले आहेत.
5 डिसेंबर 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मारकातील विविध अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण झाले होते. तेव्हापासून मागील 1 वर्ष 4 महिन्यांमध्ये म्हणजेच 12 एप्रिल 2023 पर्यंत 494 दिवसांमध्ये स्मारकाला देशापरदेशातून 1 लाख 12 हजार 826 इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट दिली आहे व प्रत्येकाने या स्मारकाच्या वेगळेपणाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.