शहरीकरणाबरोबरच हिरवळ आणि वृक्षारोपणाचीही गरज
ठाणे : सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असली तरी मूळ उष्णतेत काँक्रिटच्या उष्णतेची भर पडत असते. ठाण्यात गेल्या काही वर्षांत इमारती, रस्ते, उड्डाणपूल आदी कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने सध्याच्या तापमानात जवळपास तीन अंश सेल्सिअसची अतिरिक्त भर पडत आहे.
अरबी समुद्रात उच्च दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तरेकडून राजस्थान, आणि गुजरातसारख्या प्रांताकडे येणारे वारे महाराष्ट्रात येत आहेत. परिणामी आठवडाभरापासून राज्यात उष्णतेची लाट आहे. ठाणे जिल्ह्यात विशेषत: ठाणे शहरात हे तापमान ४२ अंशावर पोहोचले आहे. प्रत्यक्षात हे तापमान ३९ अंश सेल्सिअस एवढेच आहे. मग वाढलेले तीन अंश सेल्सिअस तापमान कशामुळे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
हवामान तज्ञ अभिजित मोडक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत विश्लेषण केले. शहरी भागात डांबराचे आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते मोठ्या प्रमाणात आहेत. हे पदार्थ उष्णता शोषून घेतात आणि ठराविक मर्यादेनंतर उष्णता बाहेर फेकतात. ठाणे शहरात येऊर परिसर वगळता सर्वत्र सिमेंट काँक्रिट आणि डांबराचे रस्ते, उड्डाणपूल आणि उंचच उंच इमारती आहेत. त्यामुळे मूळ उष्णतेत अतिरिक्त अदमासे तीन अंश सेल्सिअस तापमानाची भर पडत आहे, अशी माहिती श्री.मोडक यांनी दिली.
कमी झाडांमुळे सूर्याची किरणे थेट पडत असल्याने काँक्रिट अधिक प्रमाणात तापते. त्यामुळे मोकळ्या जागेत, रस्त्यांवर, मैदानात, टेरेसवर तापमान अधिक जाणवू शकते, असेही श्री.मोडक म्हणाले.
शहरीकरण आवश्यक असले तरी त्याचबरोबर वृक्षारोपण आणि हिरवळीचीही गरज असल्याचे मत जागर फाऊंडेशनच्या ‘निसर्गायण’ उपक्रमाचे समन्वयक विनोद पितळे यांनी व्यक्त केले. घोडबंदर परिसरात इमारतींचे जाळे असून शहरातील सर्वाधिक तापमान या भागात आढळून येत आहे. या भागात रस्त्याच्या दुतर्फा सावली देणारी झाडे, उड्डाण पुलाखाली व्हर्टीकल गार्डन, टेरेस, पार्किंगवर उद्याने निर्माण करण्याची गरज असल्याचे मत उपक्रमाच्या समन्वयक डॉ.वीणा कावलकर यांनी व्यक्त केले.
ठाणे शहरातील बहुतांशी रस्ते काँक्रीटचे आहेत. डांबरी आणि काँक्रीटच्या रस्त्यांची लांबी सुमारे ३८० किमी एवढी आहे. यात युटीडब्लूटी/ काँक्रीट रस्ते हे २५८ किमी लांबीचे असून १२२ किमी लांबीचे रस्ते डांबरी आहेत. या रस्त्यांमध्ये असलेले डांबर आणि सिमेंट उष्णता मोठ्या प्रमाणात शोषून घेत असून तेवढीच उष्णता बाहेर फेकत आहे.