अर्ध्या ठाण्यात उद्यापासून १५ टक्के पाणीकपात

महिनाभर जलबोगद्याची दुरुस्ती

ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला गळती निर्माण झाली असून या जलबोगद्याच्या दुरूस्तीचे काम शुक्रवार ३१ मार्चपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडून ठाण्याला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात महिनाभर १५ टक्के पाणीकपात होणार आहे.

मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिका क्षेत्राला मिळणारे पाणी गावदेवी, टेकडी बंगला, कोपरी कन्हैयानगर, धोबीघाट या जलकुंभावरून तसेच अंबिकानगर, हाजुरी आणि किसननगर भागाला थेट पाणी पुरवठा होतो. गावदेवी जलकुंभावरुन नौपाडा, गोखले रोड, स्टेशन परिसर, बी केबीन, राम मारुती मार्ग उजवी बाजू, महागिरी, खारकर आळी, चेंदणी, खारटन रोड, मार्केट परिसर, टेकडी बंगला जलकुंभावरुन टेकडी बंगला, वीर सावरकर पथ, संत गजानन महाराज मंदिरपर्यंत, पाचपाखाडी, नामदेववाडी, भक्ती मंदिर रस्ता, सेवा रस्ता आणि कोपरी कन्हैयानगर आणि धोबीघाट जलकुंभावरुन कोपरी गाव, ठाणेकरवाडी, सिंधी कॉलनी, साईनाथनगर, साईनगर, कोळीवाडा, सिडको संपूर्ण कोपरी (पूर्व), आनंदनगर, गांधीनगर, कान्हेवाडी, केदारेश्वर, संपूर्ण ठाणे पूर्व परिसराला पाणी पुरवठा होतो.

हाजुरी जोडणीमार्फत थेट पाणीपुरवठा लुईसवाडी, काजुवाडी, हाजूरी गाव, रघुनाथनगर, जिजामाता नगर, साईनाथ नगर, किसननगर जोडणीमार्फत किसननगर 1, किसननगर 2, किसननगर 3, शिवाजीनगर, पडवळनगर, डिसोझावाडी आणि अंबिकानगर जोडणीमार्फत अंबिकानगर 2, ज्ञानेश्वरनगर, जयभवानी नगर, राजीव गांधी नगर या परिसराला थेट पाणी पुरवठा होतो.

त्यामुळे महिनाभर या परिसरात १५ टक्के पाणी कपात राहील. या काळात नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.