ठाण्यातून शिमगोत्सवासाठी एसटीच्या ७५ जास्त बसगाड्या

२८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत तिकीट आरक्षण

ठाणे : ठाणे जिल्ह्यातून कोकणात पारंपरिक शिमगोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांची संख्या मोठी असल्याने ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारातून नियमित बसगाड्यांव्यतिरिक्त ७५ जास्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या बसगाड्यांचे तिकीट आरक्षण करण्याची सुविधा २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत सुरू राहणार आहे.

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोकणवासिय वास्तव्यास आहेत. यातील अनेक कोकणवासिय हे शिमगोत्सवासाठी गावी कोकणात जातात. या काळात कोकणवासियांना प्रवासाकरिता बसगाडीची सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांचे प्रवासादरम्यान हाल होऊ नयेत यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून दरवर्षी जास्त बसगाड्या सोडण्यात येतात. त्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होते. यंदाही राज्य परिवहन महामंडळाकडून शिमगोत्सवासाठी जास्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

कोकण भागात पारंपरिक शिमगोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. होळीच्या काळात हा उत्सव साजरा केला जात असून त्यात देवाची पालखी नाचवणे, ग्रामदैवतांची पूजा, पारंपरिक खेळ तसेच इतर परंपरांची जपणूक केली जाते. राज्य मार्ग परिवहन महामंडळने यंदाही नियमित बसगाड्यांव्यतिरिक्त जास्त बसगाड्यांचे नियोजन केले आहे. राज्य परिवहन विभागाच्या ठाणे आगारातून कोकणातील दापोली, खेड, चिपळूण, गुहागर तसेच रायगड जिल्ह्यातील महाड या प्रमुख ठिकाणांसाठी नियमित बससेवेव्यतिरिक्त एकूण ७५ जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बसगाड्यांच्या आगाऊ तिकीट आरक्षणाची सुविधा संगणकीय (ऑनलाईन) तसेच ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली असून ही प्रक्रिया २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत सुरू राहणार आहे. तसेच ग्रुप आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे एसटी वाहतूक विभागाने दिली आहे.

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेत प्रवास करता यावा यासाठी या जादा गाड्या ‘रातराणी’ प्रकारातील असून त्यामध्ये टू-बाय-टू आसन व्यवस्था उपलब्ध असणार आहे. ठाणे एसटी विभागांतर्गत असलेल्या एकूण आठ आगारांतून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये बोरीवली आगारातून १७, भाईंदर आगारातून ३, ठाणे खोपट आगारातून २१, कल्याण आगारातून १७ तसेच विठ्ठलवाडी बस आगारातून २१ जादा बससेवा चालवण्यात येणार आहेत.