तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल
ठाणे : राबोडी फातिमा स्कूल, लक्ष्मण पाटील रोड परिसरात मागील सहा महिन्यांपासून अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
राबोडी परिसरात मागील २० वर्षांपासून पाण्याचा प्रश्न कायम आहे. वाढती लोकसंख्या आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वारंवार दुरुस्तीच्या कारणास्तव पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. विशेषतः दर शुक्रवारी पाणीपुरवठा बंद केला जात असल्याने मुस्लिम बांधवांना जुम्मा नमाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पाण्याच्या टाकीची दुरुस्ती शुक्रवारी न करता इतर दिवशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राबोडी, के-विला, पंचगंगा, रुस्तमजी आणि साकेत या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, या भागासाठी किमान पाच लाख लिटर क्षमतेच्या दोन नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे राबोडी येथील अॅड. जावेद शेख यांनी सांगितले. यामुळे या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
याबाबत अॅड. जावेद शेख यांनी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर, आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन तत्काळ नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, विद्यमान यंत्रणेची सखोल तपासणी करावी तसेच पाच लाख लिटर क्षमतेच्या दोन नवीन पाण्याच्या टाक्या तातडीने मंजूर करून उभाराव्यात, अशी मागणी केली आहे. नागरिकांनी या गंभीर प्रश्नाकडे महानगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.