ठाणे जिल्ह्यात ४७,५०५ रुग्णांना नवसंजीवनी

जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान १४,४१९ गंभीर व ३३,०८६ मायनर शस्त्रक्रिया; ग्रामीण-शहरी भागात शासकीय आरोग्य सेवेची भक्कम कामगिरी

ठाणे: ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत तब्बल ४७,५०५ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत सार्वजनिक आरोग्य सेवेचा नवा मानदंड निर्माण केला आहे. यामध्ये १४,४१९ मेजर आणि ३३,०८६ मायनर शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे सर्वाधिक ४,३४१ मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या असून गंभीर आणि गुंतागुंतीच्या रुग्णांवरील उपचारात हे रुग्णालय अग्रस्थानी राहिले आहे. सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर-३ येथे २,७०५ तर उपजिल्हा रुग्णालय भिवंडी येथे २,६४३ मेजर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. मायनर शस्त्रक्रियांमध्ये भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाने १२,६१० ऑपरेशन्स करून आघाडी घेतली, तर उल्हासनगर-३ येथे ६,०७२ आणि सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे ३,२२६ लहान शस्त्रक्रिया पार पडल्या. या सर्व आकडेवारीतून जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची व्यापक पोहोच आणि नागरिकांचा वाढता विश्वास स्पष्ट होतो.

ग्रामीण भागातही आरोग्य सेवेचा मजबूत पाया उभा राहिल्याचे चित्र दिसून आले. शहापूर उपजिल्हा रुग्णालय तसेच बद्लापूर, अंबरनाथ, मुरबाड, गोवेली, टोकावडे आदी ग्रामीण रुग्णालयांमध्ये शेकडो शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. प्राथमिक उपचार उपलब्ध करून देतानाच गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय केंद्रात रेफर करण्याची सुसूत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सुविधांमध्ये समतोल साधण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.

यामध्ये शहापूर येथे तीव्र वेदनांनी त्रस्त असलेल्या एका तरुणावर जोखमीची अ‍ॅपेंडिसेक्टॉमी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आणि त्याला नवजीवन मिळाले. झाडावरून पडून हाताचे हाड बाहेर आलेल्या एका मुलावर सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे तातडीने शस्त्रक्रिया करून त्याचा हात वाचवण्यात आला. तसेच ७८ वर्षीय महिलेच्या स्तनातील कर्करोगाची गाठ काढून तिचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
ठाणे जिल्हा आरोग्य विभागाची ही कामगिरी म्हणजे ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या तत्वाची प्रचिती देणारी ठरली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या आणि बदलत्या आरोग्य
आव्हानांच्या काळात शासकीय आरोग्य व्यवस्था सक्षमपणे उभी राहिली.