ठाणे: थंडीच्या मोसमात एरव्ही हुडहुडी भरत असताना यंदा थंडीचा कडाका वाढलाच नाही. अशात ठाण्यात उन्हाचा कडाका वाढला असून सध्या त्याचा पारा ३७ अंशावर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन आजारांचे प्रमाणही वाढले आहे.
ठाण्यात गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात उकाडा वाढला असून पारा ३७ अंशाच्या पुढे सरकत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचे चटके आणि सायंकाळपासून पहाटेपर्यंत बोचणारा उकाडा असा अनुभव ठाणेकरांना येत आहे. साधारण होळीनंतर उन्हाळ्याला सुरुवात होते, मात्र हे चक्र आधीच फिरल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. वाढते प्रदूषण आणि चढत्या पार्यामुळे सर्दी, खोकला, ताप आदी आजार बळावू लागले आहेत.
हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिलेलेल्या माहितीनुसार ऋतू परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे फेब्रुवारीच्या अखेरीस तापमान वाढायला सुरुवात होते. होळीनंतर खर्या अर्थाने उन्हाळा सुरू होऊन तापमान ४० पार जाण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडून येणारी हवा मंद होऊन पूर्वेकडून जमिनीवरून हवा वाहणार आहे. त्यामुळे उकाडा वाढला तरी घामाच्या धारा आद्रता नसल्याने येणार नाही. पण मार्चनंतर तापमान वाढ होऊन घामाच्या धाराही वाढतील, असे हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून वातावरणात अचानकपणे झालेल्या बदलांचा परिणाम ठणेकरांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. अंगदुखी, सर्दी-खोकला, घसा दुखणे, ताप या आजाराने नागरिक त्रस्त झाले असून खासगी दवाखान्यात उपचारासाठी येणार्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. उष्ण वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते, त्यामुळे उन्हातून घरी आल्यावर साखरयुक्त पेय पिणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉक्टरांकडून नागरिकांना दिला जात आहे. तसेच घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी तसेच तोंडावर स्कार्फ किंवा मुखपट्टी लावावी. शक्यतो दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असा सल्ला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे.
ठाणे पालिका क्षेत्रातील तापमान फेब्रुवारीपासून वाढण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या पंधरवड्यात किमान तापमान २६ ते कमाल तापमान ३५ पर्यंत नोंदवण्यात आले होते. पण १४ फेब्रुवारीनंतर तापमान कमी-अधिक प्रमाणात बदलत असल्याचे नोंदवण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीला या महिन्यातील सर्वात कमी ३० अंश तापमान नोंदवण्यात आले. पण त्याच्या चारच दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली असल्याचे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने नोंदवले आहे.