४०० कुटुंबांचे पुनर्वसन नवीन विकासकामुळे मार्गी लागणार

आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश

ठाणे: तीन हात नाका येथील ७२ मजली इमारतीचे काम अजूनही ठप्प असून याच प्रकल्पातील पुनर्वसन योजनेतील ४०० घरांचा प्रश्न नवीन विकासक येण्याची शक्यता असल्याने मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आमदार संजय केळकर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता.

ठाणे येथील तीन हात नाका भागात ७२ मजली एसटीजी-स्टार लिव्हिंग टॉवर हा आलिशान निवासी प्रकल्पाचे काम आर्थिक संकटात सापडल्याने हे काम ठप्पच आहे. त्यामुळे या प्रकल्पातील गुंतवणूकदार आणि घर घेणारे ग्राहक चिंतेत सापडले आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव हे या प्रकल्पाचे ब्रँड अँबेसडर होते आणि त्यांनीही येथे मालमत्ता घेतल्याचे समजते. हा प्रकल्प पूर्वी “स्वेटा नाका” नावाने ओळखला जात होता. प्रकल्पाचे बांधकाम केवळ दहाव्या मजल्यापर्यंत झाले असून एप्रिल २०२३ पासून काम पूर्णपणे बंद आहे. सध्या हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) येथे प्रलंबित आहे. दरम्यान, या प्रकल्पातील पुनर्वसन योजनेतील सुमारे ४०० घरांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. या ठिकाणी नवीन विकासक येण्याची चिन्हे आहेत. पुनर्वसन योजनेतील ४०० घरांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमदार संजय केळकर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता.