चार वर्षांच्या सियानने सायकलिंगमध्ये केला विक्रम

ठाणे: ठाण्यातील अवघ्या चार वर्षांच्या सियान पाटणकर याने गजबजलेल्या रस्त्यावरून पेडल आणि सपोर्टिंग व्हील नसलेली सायकल चालवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. त्याच्या या यशाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

सियानचे वय चार वर्षे आणि दोन महिने असून ठाण्यातील दोस्ती पर्ल सोसायटीत राहतो. त्याने अर्ध्या तासात ३.३७ किमी अंतर सायकल चालवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला दखल घेण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे त्याने गजबजलेल्या रस्त्यात पेडल आणि सपोर्टिंग व्हील नसलेली सायकल चालवून साऱ्यांचे लक्ष वेधून मोठ्या सायकलपटुंनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे.

सियानला सायकलिंगबरोबरच आइस स्किंग, स्केटिंगचीही विशेष आवड आहे. त्याला क्रीडा नैपुण्याचा वारसा त्याच्या वडिलांकडून मिळाला आहे. वडील मेघन पाटणकर हे टीआयएफआरमध्ये सायंटिफिक ऑफिसर आहेत. नोकरीसोबतच त्यांना सायकलिंगमध्ये विशेष आवड आहे. त्यांनी अनेक मॅरॅथॉनमध्ये भाग घेतला असून एव्हरेस्ट कॅम्पसुद्धा सर केला आहे. सियान दोन वर्षांचा असल्यापासून वडिलांकडून सायकलिंगचे धडे घेत आहे. त्याची आई अदिती सुळे-पाटणकर या व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असून त्या देखील सियानला प्रोत्साहन देत असतात. विशेष म्हणजे सियानची आजी शैला पाटणकर या वयाच्या ७६व्या वर्षी देखील त्याला दररोज सायकलिंगच्या सरावासाठी नेत असतात.