खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी ३.५० लाख!

अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटीचे पॅकेज जाहीर

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पॅकेजची घोषणा केली. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच, अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31,628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला, तेव्हापासून मदतीच्या पॅकेजची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यातच, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हीच मागणी केली असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकजेची घोषणा केली असून सर्वांनाच मदत होईल, असे प्रयत्न सरकारचे या पॅकेजमध्ये दिसून आले आहेत. शेतकरी, नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे.

शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेलं हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज आहे. शेतकरी रब्बीचे पिक घेतोय की नाही हे विचारत न घेता आम्ही 10 हजार रुपयांची मदत करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज सकाळीच फोन केला. विम्या संदर्भात बैठक घेत तातडीनं योग्य मदत दिली पाहिजे यासाठी सरकार दबाव आणेल, व्हॅलिडेशनसाठीही आता आपण प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांना मदत करायची आहे तर ताण सहन करावा लागेल, इतकी अतिवृष्टी होईल याची कल्पना नव्हती. काही बाबींवर ताण सहन करावा लागेल, आत्ताच सांगता येत नाही. पण, शेतकऱ्यांना तत्काळ पैसे देणं सुरु करतोय, कुठे कमी करायचं आणि वाढवायचं हे डिसेंबच्या अधिवेशनात बघू, असेही फडणवीसांनी म्हटलं.

253 तालुक्यांना सरसकट मदत

राज्यात अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टर इतक्या जमिनीवरील पिकांचे नुकसान झालं आहे, साधारणपणे जास्तीचं नुकसान 29 जिल्ह्यात झालं असून आपण 253 तालुके सरसकट घेतले आहेत. त्यामध्ये, 2 हजार 59 मंडळं आहेत, जिथं 65 मिमीची अट ठेवलेली नाही. त्याठिकाणी सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न आपण करतोय, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी दिली.

दिवाळीआधी पैसे देण्याचा प्रयत्न

मराठवाड्यातील परभणी, वाशिम, जालना, यवतमाळ या जिल्ह्यात 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झालं आहे. संभाजीनगरमध्ये 75 टक्क्यांहून अधिक नुकसान आहे, तर सोलापूर धाराशिवमध्ये 80 टक्क्यांहून अधिकचं नुकसान आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसा दिवाळी पैसे आधी देता येईल, यासाठी प्रयत्न राहिल. मृत व्यक्तींचे सहाय्य आधीच दिले आहेत. काही गोष्टी ज्या राहिल्या आहेत, त्या दिवाळी आधीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जवळपास 18 हजार कोटींपेक्षा अधिक पैसे क्रॉप कम्पेन्शेसनमधून आम्ही देतोय. चार पैसे आम्ही कमी खर्च करु आणि मदत करू, असे मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आम्हाला पैसे दिले आहेत, काहींनी सीएसआर देण्याचे मान्य केले आहे. शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ नये ते यातून खर्च करू असा प्रयत्न राहिल, अशी माहितही फडणवीसांनी दिली.