डोंबिवली शहरात २५ वर्षांची पाणीसमस्या निकाली निघणार

डोंबिवली: १५० एम.एल.डी. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र असतानाही गेल्या महिन्याभरापासून या केंद्रातून डोंबिवली शहरात होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत होता. याची गंभीर नोंद घेण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार डोंबिवली जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली. परिणामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने योग्य तांत्रिक उपाययोजना राबवून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजन पूर्ण केले आहे, अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

डोंबिवली शहरातील पाणी समस्येबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, डोंबिवली शहराचा पुढील 25 वर्षांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 150 एमएलडीवरून 300 एम.एल.डी. करण्यासाठी नवीन डीपीआर तयार करण्याबाबत प्रशासनाला अधिकृत पत्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन नवीन धरणांमधून कल्याण-डोंबिवलीसाठी पाण्याचा स्थिर व सुरक्षित कोटा प्राप्त करणे, रिंग रूटच्या माध्यमातून डोंबिवलीपर्यंत रॉ-वॉटर लाईन टाकणे, तसेच नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून कचोरे गाव-देवीचा पाडा-मोठागाव-जुनी डोंबिवली-कोपर या मार्गे डोंबिवली पश्चिमेसाठी नवीन ट्रान्समिशन लाईन टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या नवीन ट्रान्समिशन लाईनमुळे डोंबिवली पश्चिमेतील ३५ वर्षे जुनी जलवाहिनीवरील ताण कमी होईल व आगामी काळातील पाणीपुरवठा अधिक सक्षम व स्थिर होईल. या सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठीचा डीपीआर लवकरच अंतिम करण्यात येईल आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्राप्त करून घेण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.