राष्ट्रीय लोक अदालतीत राज्यात ठाणे जिल्ह्याचा सलग तिस-यांदा उच्चांक
ठाणे : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तब्बल २४,०७३ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश आले असून, संपूर्ण राज्यात ठाणे जिल्हा सलग तिस-यांदा प्रथमस्थानी आहे. प्रलंबित प्रकरणांत 76 कोटी आठ लाख 51,691 रुपये इतकी रकमेची तडजोड करण्यात आली आहे.
दाखलपूर्व ६६२५ प्रकरणे निकाली निघाली. दाखलपूर्व प्रकरणांमध्ये 12 कोटी 33 लाख 171 रुपयांची तडजोड करण्यात आली तसेच दाखलपूर्व ६६२५ प्रकरणे निकाली निघाली.
विशेष म्हणजे यावेळी प्रथमच बेलापूर न्यायालयातील न्यायाधीश मंगल मोरे (८ वे, सहदिवाणी न्यायाधीश) यांनी ई फायलिंग प्रणालीद्वारे प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयोग यशस्वी केला. यामध्ये प्रकरण दाखल करण्यापासून ते निघाली निघेपर्यंत संपूर्ण कागदपत्राशिवाय ई प्रणालीने करण्यात आली. एकूण ४६ प्रकरणे ई प्रक्रियेने निघाली आहेत. या प्रणालीमुळे वादी-प्रतिवादींना प्रकरण दाखल करण्यासाठी व अन्य प्रक्रियांकरीता प्रत्यक्ष हजर राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
ठाणे जिल्ह्यात ३० एप्रिल २३ रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व अति. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक / कामगार / सहकार व इतर न्यायालयांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री, ठाणे तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अदालतचे आयोजन केले होते.
मोटार अपघात दावा न्यायाधीकरण यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांमध्ये मयत व्यक्तींच्या वारसांना जास्तीजास्त मोटार अपघात नुकसान भरपाईसाठी जिल्हा न्यायाधीश पी.एस. विठलाणी, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या सदस्य श्रीमती एस.एन. शाह, पी.आर अष्टुरकर तसेच जिल्हा न्यायाधीश एम.एस. देशपांडे ,के.आर. देशपांडे, एस.व्ही. खोंगल, आर.डी. देशपांडे या न्यायाधिशांनी पॅनल प्रमुख म्हणून विशेष प्रयत्न केले.
एका मोटर अपघात दाव्यामध्ये 58 लाख रुपये आणि एका प्रकरणात ४९ लाख ५० हजार रुपये अशा दोन प्रकरणांमध्ये उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून पिडीतांना मंजूर करण्यात आली आहे. तसेच इतर अशाच मोटार अपघात दाव्यांमध्ये यशस्वी प्रयत्न केले गेले, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली.
यावेळी अदालतीसाठी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. गेली १० ते १५वर्षे जुनी असंख्य प्रकरणे निकाली निघाली आणि वैवाहिक प्रकरणे तडजोडीस मोठया प्रमाणात यश आल्यामुळे अनेकांचे संसार जुळले. यावेळी ‘ई फायलिंग’ प्रणालीचा प्रयोग १०० टक्के यशस्वी झाल्यामुळे, पेपरलेस ई फायलिंग प्रकरणात एकूण ४६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
मोटार अपघातांच्या २३५ प्रकरणांमध्ये तडजोड झाल्यामुळे १८,००,४७,५२८ रु. नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ठाणे मुख्यालयात १६२ मोटार अपघात प्रकरणांत तडजोड होऊन १२,०३,४३,२२८ रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.यामध्ये जुन्या प्रकरणांचाही समावेश आहे.
कल्याण तालुका न्यायालयामध्ये २२ मोटार अपघात प्रकरणांत तडजोड होऊन एक कोटी १८ हजार रुपयांची भरपाई मंजूर झाली. लोक अदालतमध्ये ठाणे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालयातील एकूण ५३ केसेसमध्ये दोषसिद्धीचे निकाल दिले आहेत. एकूण १३ लाख ७५ हजार इतक्या रकमेचा दंड आरोपींकडून आकारण्यात आला.
दाखलपूर्व बँक रिकव्हरीची एकूण १६७ प्रकरणेही निकाली निघाल्यामुळे ७२,९५, ४७५ इतक्या रकमेची तडजोड झाली. एनआय अॅक्ट कलम १३८ ची ११३० प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली. त्यातून तडजोडीची रक्कम रु. १५,९५,२५,६९३ रुपये इतकी आहे. तसेच प्रॉपर्टी टॅक्स/रेव्हेन्युची दाखलपूर्व ३२७० प्रकरणे निकालात निघाल्यामुळे तडजोडीची रक्कम रु. ३,१७,५४,८७० आहे. पाणीपट्टीचीही दाखलपूर्व १३९८ प्रकरणे निकालात निघाल्यामुळे एकूण तडजोडीची रक्कम ४१,३४,६१३ रुपये आहे.
लोकअदालतीमध्ये कारागृहातील न्यायाधीन बंद्यांची प्रकरणे ठेवण्यात आली. कारागृहातील न्यायाधीन बंदींपैकी जवळपास ५५ बंद्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. अदालतीमध्ये फौजदारी प्रकरणात गुन्हेगारांकडून गुन्हा कबूलीला प्रतिसाद मिळाला असून, जवळपास ४३७ आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबुल करून दंडाची रक्कम जमा केली.
मोटार अपघात दावा नुकसानीच्या 235 प्रकरणांमध्ये त्यांना 18 कोटी 47 लाख 528 रुपयांची नुकसान रक्कम मंजूर करण्यात आली. या प्रकरणांपैकी ठाणे मुख्यालयात एकूण 162 प्रकरणांमध्ये १२ कोटी तीन लाख 228 एवढी नुकसान भरपाई देण्यात आली. यामध्ये जुन्या प्रकरणांचाही समावेश आहे. कल्याण तालुका न्यायालयात २२ मोटार अपघात प्रकरणांत तडजोड होऊन एक कोटी १८ हजार रुपयांची नुकसान भरपाई मान्य करण्यात आली.