कोरोनाकाळातील अखर्चित निधी २० ग्रामपंचायतींना मिळाला परत

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे मुरबाडमधील २० सरपंचांकडून आभार

मुरबाड : कोरोना आपत्तीच्या काळात अनेक अडचणींमुळे विकासकामांवर खर्च न झालेला १ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मुरबाडमधील २० ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून परत मिळाला आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निर्देशानंतर, राज्य सरकारच्या वित्त व नियोजन विभागाने कार्यवाही करुन शासन निर्णय जारी केला आहे. याबद्दल मुरबाडमधील २० गावांच्या सरपंचांकडून श्री. कपिल पाटील यांचे आभार मानण्यात आले आहेत.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये जनसुविधा अंतर्गत मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायतींना निधी देण्यात आला होता. मात्र, कोरोना आपत्तीच्या काळात तालुक्यातील २० ग्रामपंचायतींना वेळेत निधी खर्च करता आला नव्हता. राज्य सरकारच्या निर्णयानुसार, २० ग्रामपंचायतींच्या वाट्याचा १ कोटी २१ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारकडे परत गेला होता. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या विकासकामांवर परिणाम झाला होता. तालुक्यातील २० गावांच्या सरपंचांनी ही व्यथा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना सांगितली. तसेच राज्य सरकारकडे परत गेलेला निधी परत मिळवून देण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून राज्य सरकारच्या वित्त व नियोजन विभागाकडे पत्र पाठविण्यात आले होते. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर श्री. कपिल पाटील यांनी चर्चा केली होती.

अखेर या प्रयत्नांना यश आले असून, राज्य सरकारच्या नियोजन विभागाने काल शासन निर्णयाद्वारे २०२०-२१ मधील अखर्चित १ कोटी २१ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली. तसेच २०२३-२४ मधील विकासकामांसाठी हा निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे २० ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे. त्यांना या निधीतून कामे हाती घेता येतील.