केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे निर्देश
ठाणे: बारवी धरण प्रकल्पात जमीन गेल्यानंतर बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या १८ कुटुंबातील तरुण सरकारी नोकरी मिळविण्यासाठी पात्र ठरले आहेत. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी घेतलेल्या बैठकीत तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून १८ तरुणांना पात्र ठरविण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासूनच्या प्रतिक्षेतील तरुणांना दिलासा मिळाला आहे.
बारवी धरण ते मुरबाड जलवाहिनी रस्त्याबरोबरच देवपे, पशेणी आणि देवगाव येथील बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व काही शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बारवी धरण प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार देवपे, पशेणी आणि देवगावमधील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बैठक झाली. धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील १८ तरुण नोकरीसाठी अपात्र ठरले होते. या १८ तरुणांना पात्र ठरविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश श्री. पाटील यांनी दिले. त्याचबरोबर देवपे गावातील शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला देण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.