ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणास सुरुवात झाली. या विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून पहिल्या दोन दिवसात जवळपास १० हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून सर्वचजण प्रतिक्षेत होते की, या विमानतळावरुन उड्डाण सेवा कधी सुरु होईल. हे विमानतळ सुरु झाल्यामुळे मुंबई विमानतळावरील भार कमी झाला असून ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या आसपासच्या शहरातील नागरिकांना या विमानतळावरुन प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे. अखेर २५ तारखेपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन व्यावसायिक उड्डाणाला सुरुवात झाली.
पहिल्या दोन दिवसात प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिली. ते म्हणाले, २४ डिसेंबर रोजी आगमनासाठी प्रवासी भार ७१ टक्के तर, प्रस्थानासाठी ८३ टक्के होता. मात्र २५ डिसेंबर रोजी नियोजित उड्डाणे सुरू होताच आगमनाचा भार ८५ टक्क्यांवर गेला, तर प्रस्थानाचा भार ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला. नाताळच्या दिवशी ऑपरेशन्स सुरू झाल्याने बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली.
प्रवासी सेवांबरोबरच, २५ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतर्गत कार्गो ऑपरेशन्सनाही सुरुवात झाली. बेंगळुरूहून इंडिगोच्या 6E460 या उड्डाणाद्वारे पहिली कार्गो शिपमेंट येथे पोहोचली. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एक उदयोन्मुख प्रादेशिक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय कार्गो सेवांचा विस्तार करण्याचीही योजना आहे. “मुंबईकरांसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. हे विमानतळ विकसित करण्याचे हक्क आम्हाला मिळाले, हे आमचे सौभाग्य आहे, असे गौतम अदानी म्हणाले.
पहिल्या महिन्यात या विमानतळ दररोज १२ तास म्हणजे सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत कार्यरत राहणार असून, दररोज २३ नियोजित प्रस्थान उड्डाणे होतील. या कालावधीत विमानतळ दर तासाला १० उड्डाण हालचाली व्यवस्थापित करणार आहे. तर, फेब्रुवारी २०२६ पासून विमानतळ २४ तास कार्यरत होणार असून, वाढत्या मागणीला सामोरे जाण्यासाठी दररोज ३४ प्रस्थान उड्डाणे सुरू केली जातील.
*ऑपरेशन्सच्या पहिल्या दिवशी विमानतळावर एकूण ४९२२ प्रवाशांची वाहतूक झाली. यामध्ये २२७८ आगमन प्रवासी आणि २६४४ प्रस्थान प्रवाशांचा समावेश होता. ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातून मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले. २६ डिसेंबर रोजी प्रवासी संख्येत आणखी वाढ होऊन एकूण ५०२८ प्रवाशांची नोंद झाली.*