बंद पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर
नवी मुंबई: धरणांमधील घटता जलसाठा, वाढती उष्णता आणि हवामान विभागाने व्यक्त केलेल्या एल-निनो व आयओडीच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाने आपल्या पाणीपुरवठा क्षेत्रात 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात गुरुवार 28 मे 2026 पासून लागू होणार असून पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.
सिडको क्षेत्राला हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण तसेच मजीप्रा यांच्या पाताळगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून उपयुक्त जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
सिडको प्रशासनाकडून सर्व जलस्रोतांतील उपलब्ध साठा, दैनंदिन पाणीपुरवठा आणि स्थानिक वितरण व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यात येत असून भविष्यात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही पाणी कपात लागू करण्यात आली आहे.
हेटवणे, मोरबे आणि इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होऊन जलसाठ्यात वाढ होईपर्यंत ही कपात कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनीदेखील त्यांच्या कार्यक्षेत्रात पाणी कपातीचे निर्णय घेतले आहेत.
सुधारित पाणीपुरवठा बंद राहण्याचे वेळापत्रक
खारघर: सोमवार,तळोजा: शुक्रवार, कळंबोली व नावडे: बुधवार, कामोठे: शुक्रवार, नवीन पनवेल (पूर्व): सोमवार, नवीन पनवेल (पश्चिम): मंगळवार, करंजाडे: गुरुवार, काळुंद्रे: शुक्रवार, उलवे (सेक्टर 2, 3, 5, 6, 19, 19A, 20, 21, 23, गव्हाण व मोरावे गाव): मंगळवार, उलवे (सेक्टर 8, 8A, 9, 10B, 15, 16, 16A, 17, 18, 24, कोपर, शिवाजीनगर, न्हावा, शेवा व बामणडोंगरी): शुक्रवार, उलवे सेक्टर 25 व 25A तसेच द्रोणागिरी: रविवार