ठाणे बॅडमिंटन अकॅडमीला तीन सुवर्ण आणि एक ब्रॉंझ पदक

महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद

ठाणे: मुंबई येथील वरळीच्या विलिंग्टन जिमखाना येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा उल्लेखनीय आणि दिमाखदार कामगिरी करत तीन सुवर्ण पदके आणि एका कांस्य पदकाची कमाई केली

मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, राजीव गणपुळे, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर आणि देवांग दलाल यांच्या प्रशिक्षणाखाली खेळाडू सातत्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत आहेत.

१९ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात सानिध्य एकाडे याने शानदार खेळ करत सुवर्ण पदक पटकावले. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यापूर्वी सानिध्य आणि त्याच्या जोडीदाराने उदयान साळुंखे व सारा साळुंखे यांचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत सार्थक नलावडे व दितीशा सोमकुवर यांच्या विरोधात रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात २१-१४, २०-२२, २१-१८ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत ओजस जोशी व तन्वी घरपुरे यांच्या विरोधात पहिला गेम गमावल्यानंतर सानिध्यने दमदार पुनरागमन करत १२-२१, २१-१७, २१-१७ असा विजय मिळवला. अंतिम सामन्यात सयरा आणि सयाजी शेलार या जोडीवर २१-१४, २१-११ असा सरळ गेममध्ये विजय मिळवत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली.

१९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात प्रथम मानांकित आर्यन बिराजदार आणि अर्जुन बिराजदार या जोडीने संपूर्ण स्पर्धेत अक्षरशः वर्चस्व गाजवत सुवर्ण पदक पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी आदित्य पुजारी व प्रसन्न मन्ना यांचा २१-१०, २१-१६ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत अभिक शर्मा व स्वरित सातपुते या जोडीवर २१-१२, २१-१३ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात आयुष अडे आणि तनय मेहेंदळे यांच्या विरोधातही त्यांनी आणि नियंत्रित खेळाचे प्रदर्शन करत २१-१२, २१-१४ असा दिमाखदार विजय मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली. तर अपूर्व दवाडते याने मिश्र दुहेरी गटात कांस्य पदकाची कमाई करत अकॅडमीच्या पदकतालिकेत आणखी भर घातली.