कल्याण: माझी वसुंधरा अभियान 5.0” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविले जाते. यामध्ये अमृत गट (विभाग स्तरावर) कल्याण-डोंबिवली महापालिकेस दीड कोटीचे बक्षिस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे.
सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी या अभियानात राज्यातील 422 नागरी स्वराज्य संस्था व 27,895 ग्रामपंचायती अशा एकुण 28,317 स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता.
“माझी वसुंधरा अभियान 5.0” मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले आणि या दोन्हीही मुल्यमापनातील एकुण गुणांच्या आधारे “माझी वसुंधरा अभियान 5.0” मधील लोकसंख्या निहाय 14 गटातील विजेते, यांची शासनाच्या मान्यतेनुसार निवड करण्यात आली. याबाबतच्या निकषांमध्ये वृक्षारोपण, सौरऊर्जा वापर, तलावांचे सुशोभिकरण, वायु गुणवत्ता चाचणी, नागरीकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती इ. या निकषांवर आधारीत गुणांकन करण्यात आले. महापालिकेला मिळालेल्या या पुरस्कारामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.